July 6, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपी शाळांच्या “या’ प्रगतीमुळे खाजगी शाळांची झोप उडाली

सोलापूर : जिल्हा परिषद शाळा पाचवीपर्यंत झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खाजगी शाळा चालवणाऱ्यांची झोप उडाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सभापती चेतनसिंह केदार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील झेडपी शाळांना पाचवीच्या वर्गांना मंजुरी मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे 2800 शाळा आहेत. या शाळांमध्ये आत्तापर्यंत पहिली ते चौथी वर्ग भरविले जात होते. चौथीनंतर विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये प्रवेश करून पुढील शिक्षणाची सोय करून घेताना दिसून येत होते. यापूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केल्यास जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंतच्या केंद्रशाळा होत्या. पण प्राथमिक शिक्षण रचनेत बदल झाल्यानंतर या शाळा चौथीपर्यंत आल्या. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या काही माध्यमिक शाळाही आहेत तेथे आठवीपर्यंतची शिक्षणाची सोय आहे.

चौथीनंतर विद्यार्थी पाचवीच्या वर्गासाठी खाजगी शाळांकडे जात असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खाजगी शिक्षण संस्था उभारल्या गेल्या आहेत. आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढील पाऊल टाकले आहे. पाचवीच्या वर्गाला मंजुरी घेतल्याने ज्या विभागातील या शाळा आहेत त्या विभागातील खाजगी शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून पाचवीचे विद्यार्थी न येण्यामुळे आता त्यांची तुकडी धोक्यात आली आहे. त्यामुळे खाजगी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जिल्हा परिषद शाळांनी अपडेट होण्याचे ठरविल्यावर भविष्यात अशाच प्रकारे अनेक शाळांवर गडांतर येणार आहे. त्यामुळे पाचवीच्या शाळा कोणत्या ठिकाणी मंजूर झाल्या याची माहिती घेण्यासाठी अनेक शिक्षक जिल्हा परिषदेत येताना दिसत आहेत. झेडपी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी भविष्यात असे अनेक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सभापती चेतनसिंह केदार यांनी सांगितले.

शाळेत अतिक्रमणे वाढली…

जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत अतिक्रमण झाल्याचे वृत्त “सोलापूर समाचार’ ने प्रसिद्ध केले होते. पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील शाळेनंतर आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर जिल्हा परिषद शाळेत ही अशाच प्रकारे अतिक्रमण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे या अतिक्रमणाबाबत काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.