July 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

उजनी धरणातून चंद्रभागा नदीपात्रात वारीच्या तीन दिवस अगोदर पाणी येणार

पंढरपूर : आषाढी वारी 2026 च्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्र व वाळवंटाची स्वच्छता करण्याची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला असलेली झुडपे, राडारोडा व कचरा पूर्णपणे काढून सपाटीकरण करावे, नदीकाठाच्या दोन्ही बाजूंची स्वच्छता करावी. तसेच वारीपरी संपूर्ण वाळवंट स्वच्छ करण्याबरोबरच संपूर्ण यात्रा कालावधीत व त्यानंतरही वाळवंटात भाविकांची गर्दी असेपर्यंत स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्रीमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा

नदीपात्रात प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था करावी, तसेच वाळवंटाच्या सफाईसाठी स्वतंत्र ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वाळवंटाच्या प्रत्येक भागात पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाळवंट कायम स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. स्वच्छता कर्मचाऱ्यांना विविध भाग वाटून देण्यात आले असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंटाची स्वच्छता करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सफाई कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. वारीपूर्वी वाळवंटाची झालेली स्वच्छता पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. त्यावेळी ते चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी येतात. स्वच्छ वाळवंट पाहून त्यांना आनंदाने स्नान करता येईल. ‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, आनंदी वारी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे, असे पालकमंत्री गोरे म्हणाले. तसेच आषाढी वारीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू असून वारी पूर्वी तीन दिवस अगोदर चंद्रभागा नदी पात्रात पाणी पोहोचेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आषाढीला 32 लाख भाविकांची शक्यता

यंदाच्या संपूर्ण आषाढी वारी कालावधीत 30 ते 32 लाख भाविक-वारकरी येण्याची शक्यता आहे. आषाढी यात्रा सोहळा सुखकर व निर्विघ्नपणे पार पाडावा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. वारी कालावधीत वारकऱ्यांना रहदारीचा त्रास होऊ नये, यासाठी पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढण्यात प्रशासनाला यश आले असून, ही अतिक्रमणविरोधी मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर शहर व परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वाळवंटात वारकरी भाविकांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, तात्पुरती मुबलक शौचालये व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन मंडपाचे काम सुरू असून, यंदाच्या आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांसाठी जनक महाराज अपशिंगेकर यांच्या खासगी मालकीच्या जागेत मंदिर समितीकडून नव्याने दर्शन रांगेसाठी शेडची उभारणी करण्यात आली आहे. पालकमंत्री श्री. गोरे यांनी या ठिकाणची पाहणी करून दर्शन रांगेतील भाविकांसाठी सुलभ शौचालय, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहआयुक्त नगरपालिका प्रशासन आशिष लोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.