पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक सुविधा उभारल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाची लांबी १२० किमी असून या मार्गावर ९१ ग्रामपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश आहे. ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने केलेले सूक्ष्म नियोजन व त्याची अंलबजावणी करण्यासाठी २५ हजार ५०० अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडत आहेत.
१०२ वारकरी सुविधा केंद्र
पालखी मार्गावर एकूण १०२ वारकरी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये ४,८२,७७७ चौरस फूट क्षेत्रात ३७ जलरोधक मंडप आणि ४,९४,००० चौरस फूट क्षेत्रात २३ जर्मन हॅंगर मंडपांचा समावेश आहे. निवारा, विश्रांती व भोजनासाठी ही केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
स्वच्छता व अनुषंगिक सेवा
स्वच्छतेवर विशेष भर देताना मार्गावर ६२५० फिरती शौचालये, ४९२१ कायमस्वरूपी शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वच्छतेसाठी १९५५ स्वच्छता सेवक आणि १२६ सक्शन व जेटिंग वाहने तैनात करण्यात आली आहेत.
पाणी व महिला वारकरी सुविधा
पिण्याच्या पाण्यासाठी ३२१ पाणी टँकर व १५९ पाणी उद्भव स्त्रोतांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी ४१०० महिला स्नानगृहे व १७९ हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत.
आरोग्य व मनुष्यबळ
आरोग्य सुविधेंतर्गत २१ अतिदक्षता विभाग व १२१ आरोग्य दूत-बाईक ॲम्ब्युलन्स तैनात आहेत. संपूर्ण यंत्रणेसाठी १०६५ अधिकारी व २४,४३५ कर्मचारी असे एकूण २५,५०० हून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून ‘भक्ती विठ्ठलाची… सेवा वारकऱ्यांची’ या भावनेतून प्रशासनाने नियोजन केले आहे. अनेक मानाच्या पालकांनी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केलेला असून प्रशासनाच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने स्वागत केलेले आहे. प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सर्व सोयी सुविधा प्रत्यक्ष वारकरी भाविक यांच्याकडून वापरल्या जात असून त्याबद्दल ते समाधानही व्यक्त करत आहेत.

More Stories
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी
“ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात भक्तिरसाचा सोहळा; अश्वांच्या दौडीने रिंगण उजळले
सोलापूर झेडपीचे संतोष कुलकर्णी झाले अधीक्षक अभियंता