सोलापूर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार देशभरामध्ये उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-23 ते 2026-27 मध्ये राबवण्यात येत आहे. राज्यामध्येही 15 वर्षे व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांना नवसाक्षर करण्याच्या उद्देशाने सदर योजना महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय (योजना)कार्यालय, पुणे व SCERT, पुणे यांचेमार्फत राबविली जात आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर कडे येणाऱ्या मानाच्या पालखी सोहळ्यांबरोबर काढण्यात आलेल्या साक्षरतेच्या दिंडीमध्ये साडेतीनशे निरक्षर आढळले आहेत.
या योजनेचा सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचार- प्रसार व्हावा या उद्देशाने सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या तीन वर्षापासून साक्षरतेची वारी पंढरीच्या दारी या नाविण्यपूर्ण उपक्रमाची पंरपरा चालू आहे. डॉ .महेश पालकर व राजेश क्षीरसागर ( पूर्व शिक्षण संचालक, उपसंचालक योजना संचालनालय ) यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली व संभाजी देशमुख, राज्य समन्वयक प्रचार प्रसार यांच्या संकल्पनेतून हा “वारी साक्षरतेचा उपक्रम” चालू झालेला आहे.
या उपक्रमांचा एक भाग म्हणून शिक्षण संचालनालय (योजना), कार्यालय, पुणे चे संचालक कृष्णकुमार पाटील व उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पण पंरपरेप्रमाणे “वारी साक्षरतेचा” हा एक महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पंढरीच्या वारीमधील असाक्षर वारकऱ्यांना साक्षरतेचे महत्व पटवून देणे, त्यांची नोंदणी करणे व उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा उद्देश पटवून देणे हा आहे. देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गावर स्वतंत्र साक्षरता रथाचे आयोजन करण्यात आले आहे.
आळंदी मार्गवरील रथासोबत
योजना कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक, उल्लास चे राज्य समन्वयक संभाजीराव देशमुख, स्वयंसेवक नागसेन साबळे, लव गायकवाड, अनंता पोकळे, राजेश गुंजाळ हे आहेत.
साक्षरतेची वारी | पंढरीचे दारी
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम या उपक्रमातर्गत संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजनाच्या पालखी सोहळ्यात रथ सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील कलावंत, प्रतिभावान शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात शिक्षक राजू जग्गे, कीर्तनकार शिक्षक गणेश भगत, दत्तात्रय जोशी, अविनाश रूपदे हे स्वयंसेवक शिक्षक व सचिन कवळस नोडल अधिकारी या रथाचे संचलन करत आहेत. भारूड, कीर्तन, पथनाट्य, नृत्य यातून साक्षरतेचा प्रचार केला जात आहे. यातून वारीमध्ये वारकऱ्यांना साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले जाते आहे. निरक्षरांचे फॉर्म भरून नोंदणी केली जात आहे.
“ गेले सांगून ज्ञाना तुका, झाला उशीर तरी शिका..,’’ “अक्षर कळे , संकट टळे “ आशा घोषणातून लोकसहभाग नोंदवला जात आहे. यात पालखी मार्गावरील शाळामधील केंद्रप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी सहभागी होत आहेत. अकलूज येथे या शिक्षण रथाचे स्वागत करत सोलापूर जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक ) सचिन जगताप यांनी सर्व शाळेमध्ये विसावलेल्या दिंड्यातील वारकऱ्याबरोबर संवाद साधला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या सीड बॉलचे वाटप केले. बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या उपक्रमास भेट दिली व रथाचे स्वागत केले.बेलवाडी येथील रिंगणप्रसंगी शिक्षण संचालक ( योजना) कृष्णकुमार पाटील यांनी भेट देऊन वारकऱ्यांना माहिती दिली. साक्षरता वारी रथातून वाचन- लेखनाचे महत्व विषद केले जात आहे.

More Stories
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट
वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधामुळे पालकमंत्री गोरे व जिल्हा प्रशासनाच्या कामाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक
७०० किलोमीटरचा प्रवास करून संत मुक्ताई पालखी आली सोलापूर जिल्ह्यात