सोलापूर : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आपला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करतानाच दुसऱ्यांदा आलेली प्रभारी सीईओंची जबाबदारी सत्कारणी लावली आहे. जिल्हा परिषदेतील विविध विभागाकडून करण्यात आलेल्या कामांबाबत विभागीय आयुक्त व लेखापरीक्षण विभागाकडून काढण्यात आलेले परिच्छेद निकालीत काढण्याची मोहीम त्यांनी यशस्वी केली आहे. त्यामुळे सीईओ कुलदीप जंगम त्यांचा पुढील कार्यकाल सुरळीत मार्गी लागण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 जानेवारी 2022 रोजी पदभार घेतला. या दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना प्रभारी सीईओ व्हायची दोन वेळा संधी मिळाली. तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यावर त्यांनी कारभार सांभाळला होता. या काळात प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे बजेट मांडण्याची त्यांना संधी मिळाली होती. आता सीईओ कुलदीप जंगम हे त्यांच्या खाजगी कामासाठी रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी सीईओ म्हणून कोहिनकर कामकाज पाहत आहेत. ही जबाबदारी आल्यावर त्यांनी अनेक दिवसापासून राहिलेली कामे मार्गी लावण्याची मोहीम हाती घेतली. विभागीय आयुक्त कार्यालय व लेखापरीक्षणाकडून जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या विकास कामावर झालेल्या खर्चाचे ऑडिट केले जाते. यामध्ये खर्चामध्ये राहिलेल्या तफावतीच्या चुका काढल्या जातात. या चुका वेळेत दुरुस्त करून खर्चाचे ऑडिट करून घेणे गरजेचे असते. आयुक्त कार्यालय व ऑडिटरकडून काढलेले परिच्छेद निकाली काढण्याची मोहीम कोहिनकर यांनी हाती घेतली. यासाठी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाकडे राहिलेल्या परिच्छेदांचा आढावा घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 12 व 13 डिसेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन केले. या दोन दिवशी कोहिनकर यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून सुमारे अकराशे परिच्छेद निकालीत काढण्याचा विक्रम केला. त्यानंतर इतर परीक्षेत निकाली काढण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच प्रशासन अधिकारी, कक्ष अधिकारी व अधीक्षक यांची बैठक घेतली. त्यानंतर मंगळवारी विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. प्रत्येक विभागवाईज राहिलेली सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यामुळे मुख्य लेखा, प्रशासन व ग्रामपंचायत विभागाची खूप मोठी प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात प्रशासनाधिकारी, कक्ष अधिकारी व अधीक्षक हे आयुक्त कार्यालयाकडून ऑडिटमध्ये निघालेले मुद्दे व लेखा परीक्षकांनी काढलेले परिच्छेद निकाली काढण्याच्या कामात गुंतलेले दिसून आले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी राबवलेली ही मोहीम जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती देणारी ठरणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा कोहिनकर पॅटर्न पुन्हा राज्यभरात चर्चेत आला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय व लेखा परीक्षकाद्वारे जिल्हा परिषदेच्या खर्चाबाबत ऑडिट पॉईंट उपस्थित केले जातात. हे पॉइंट निकालीत काढणे गरजेचे असते. कर्मचाऱ्यांनी काय चुका केल्या हे त्यांना माहीत होण्यासाठी दोन दिवस विशेष शिबिर घेतले. सर्व विभागांचे पॉईंट निकालीत निघून झेडपीचा कारभार गतिमान व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
संदीप कोहिणकर,
प्रभारी सीईओ व प्रशासक,
जिल्हा परिषद, सोलापूर