August 26, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

गरोदर माता, झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेतोय जिल्हा आरोग्य विभाग

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमधील 19 विद्यार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रियेनंतर जिल्हा आरोग्य विभागाने पुन्हा जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे आरोग्य व गरोदर मातांची काळजी घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या सूचनेनुसार व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्य तपासणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी मार्डी व बाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळांना नुकतीच भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या उपक्रमांतर्गत ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय पथकामार्फत नियमित तपासणी केली जाते. ही तपासणी वेळेवर होत आहे का आणि विद्यार्थ्यांना योग्य आरोग्य सेवा मिळत आहेत का, याचा प्रत्यक्ष आढावा डॉ. कोपुरवाड यांनी या भेटीदरम्यान घेतला. तपासणीत आढळणाऱ्या आजार किंवा समस्यांवर तात्काळ उपचार व संदर्भ सेवा पुरवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी आरोग्य पथकांना दिल्या.
याप्रसंगी कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन शेगर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आम्हीही जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेतले आहे. परिस्थिती कशीही असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी मोठी ध्येये गाठावीत, असा संदेश त्यांनी दिला.

मार्गदर्शनातील मुख्य मुद्दे
आरोग्य सवयी: वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, संतुलित आहार, योगासने आणि मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

डिजिटल डिटॉक्स

मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना सतर्क करण्यात आले.

गरोदर मातेची चौकशी

मार्डी येथील एका अति जोखमीच्या (High-Risk) गर्भवती मातेच्या घरी भेट देऊन पथकाने तिची विचारपूस केली व आरोग्य कर्मचाऱ्यांना तिच्यावर विशेष देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा समन्वयक प्रदीप नामदे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.