August 26, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

कानडी भागात सुरू केलेल्या स्पोकन इंग्लिश उपक्रमाचे सीईओ कुशल जैन यांनी केले कौतुक

सोलापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढवून त्यांना दैनंदिन जीवनात सहजपणे इंग्रजी संभाषण करता यावे, या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सुरू केलेल्या अभिनव उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या बैठकीत या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण तसेच दक्षिण सोलापूर गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, मल्लिनाथ स्वामी तसेच निवडक इंग्रजी शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते इंग्रजी शिक्षण न देता प्रत्यक्ष व्यवहारात इंग्रजीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. परिपाठामध्ये इंग्रजी भाषेत भाषण, सुविचार, बातमी वाचन, संवाद सादरीकरण यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.
शाळांमध्ये इंग्रजी वर्तमानपत्र वाचन, इंग्रजी फलक लेखन, दररोज मराठीसोबत इंग्रजी सुविचार लेखन तसेच विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन इंग्रजी संभाषणाची सवय निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढण्यासोबतच इंग्रजी बोलण्याची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमातील विशेष संकल्पना म्हणजे ‘इंग्रजी स्टार रेटिंग’. शाळेतील किती टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये सहज संवाद साधू शकतात, याच्या आधारे शाळांना One Star ते Five Star अशी श्रेणी देण्याची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे, असे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. दक्षिण सोलापुरात कर्नाटक सीमावृत्ती भागात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांवर कानडी भाषेचा प्रभाव आहे. त्यामुळे “इंग्लिश स्पोकन’ उपक्रमाचा चांगला उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास निर्माण करणारा असून अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रथम दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवावा. त्याचे सकारात्मक परिणाम आणि अनुभव लक्षात घेऊन पुढील टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.