सोलापूर : नवरात्र उत्सव तोंडावर आहे. नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते देवीची प्रतिष्ठापना व विविध कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये दंग आहेत. अशात जुळे सोलापुरात एका कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ‘गरबा” आयोजनावरून आजी-माजी आमदाराच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘राजकारण” रंगल्याने सर्वांची करमणूक होत आहे.
विधानसभा निवडणूक केव्हा होणार याचा अद्याप पत्ता नाही. पण दक्षिण सोलापूर तालुक्यात मात्र आगामी विधानसभा निवडणुकीवरून चांगलीच मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. जुळे सोलापूर हा मोठा विभाग दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मालक गटाने जुळे सोलापूरला लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवात या गटाने चक्क श्री गणेश मूर्तींचे मोफत वाटप केले. त्यानंतर आता नवरात्र उत्सवाचाही चांगला लाभ घ्यायचा या उद्देशाने ‘गरबा” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या या गरब्याकडे जात असल्याचे लक्षात आल्यावर बापू गटाने गरब्याची घोषणा केली. त्यांनी यासाठी सर्व माजी नगरसेविकांना कामाला लावले लावले असून या कार्यक्रमासाठी जुळे सोलापुरातील मोठे मैदानच बुक केले आहे. मालक आणि बापूंच्या कार्यकर्त्यांनी गरब्याच्या कार्यक्रमाचे मोठमोठे फलक जुळे सोलापुरात चौकाचौकात लावले आहेत. दोघांचेही फलक आमने-सामने आल्याने लोकांची चांगलीच करमणूक होत आहे.
का मिळतोय प्रतिसाद..
सोलापुरात गणेश उत्सवात लेझीमचे खेळ खूपच फेमस झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महिलांचाही गरबा खेळण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालक गटाने यासाठी शुल्क ठेवले आहे तर बापू गटाने मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे. पण यासाठी महिलांना ड्रेसचा खर्च करावा लागणार असून घरोघरी याची तजवीज सुरू झाली आहे. यापूर्वी नवरात्र उत्सवात ठराविक मंडळातर्फेच हा कार्यक्रम घेतला जात होता. पण आता याला राजकीय स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. गरबाचे विविध प्रकार असल्याने कार्यकर्त्यांनी प्रशिक्षक नेमून महिलांना या खेळातील प्रकाराचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यामुळे महिला वर्गांचा या खेळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जोडपे, तरुणी व ज्येष्ठ महिलांनीही या खेळासाठी नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. पण या खेळाच्या आडून आता राजकीय फायदा उठवला जात असल्याचे चित्र आहे.