सोलापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे रोस्टर ( बिंदू नामावली) पुन्हा एकदा नव्याने करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे रोस्टर गेल्या पाच वर्षात झाले नव्हते. त्यामुळे पदोन्नती, बदल्या व पदभरतीत अडचणी येत होत्या. ही निकड लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने 21 कर्मचाऱ्यांद्वारे शिक्षकांच्या फाईली तपासून नव्याने रोस्टर करून पुण्याच्या मागासवर्गीय कक्षाकडे पाठवले होते. या अहवालातील माहिती मिळाल्यानंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आंदोलन केलं होतं. नव्या रोस्टरमध्ये एनटीसीच्या चुकीच्या जागा दाखविल्याचा त्यांचा आरोप होता. मागासवर्गीय कक्षाने अहवाल पुन्हा एकदा तपासण्याच्या सूचना केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने पुन्हा एकदा रोस्टरवर काम सुरू केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकांची 8 हजार 741 मंजूर पदे आहेत. सध्या आठ हजार 160 शिक्षक कार्यरत आहेत. 581 जागा रिक्त आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या रोस्टरमध्ये एनटीसी प्रवर्गासाठी 85 जागा अधिक असल्याचे दाखविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा शिक्षकांच्या फाईली तपासून रोस्टर ठरविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील व त्याचबरोबर तालुक्यातील कर्मचारी घेण्यात आले आहेत. दररोज पहाटे तीन वाजेपर्यंत कर्मचारी व अधिकारी बसून प्रत्येक फाईल काटेकोरपणे तपासली जात आहे. त्यामुळे आता नव्याने तयार होणाऱ्या अहवालावर कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही इतकी काळजी घेण्यात आल्याचे सीईओ आव्हाळे यांनी सांगितले.
कामात हायगय नाहीच…
झेडपी प्रशासनाच्या कामाला गती देण्यात येत आहे. यासाठी आठवड्यात मी तालुक्याचा दौरा करून जलजीवन, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडीचे कामकाज पाहणार आहे. उत्तर सोलापूर व सांगोल्यामध्ये भेटी दिल्या आहेत. यापुढेही भेटी सुरूच राहणार असून कामात हायगय दिसल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीईओ आव्हाळे यांनी दिला. समाजकल्याण विभागातील कामे प्रलंबित असल्याचे दिसून आल्याने समाजकल्याण अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंधरा दिवसात सुधारणा न झाल्यास कारवाई अटळ आहे, असेही त्या म्हणाल्या. शिक्षक भारती संघटनेने केलेली तक्रार गांभीर्याने घेतली असून प्रशासन व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना काटेकोरपणे चौकशी करून संबंधित दोषी आढळल्यास कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. अजूनही कोणी आहे त्याच ठिकाणी असेल तर याची गंभीर दखल घेतली जाईल, अशा इशारा त्यांनी दिला.