सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी- दुधनी रस्त्यावर जीपची धडक लागून शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे वाढदिवस असल्याने धाब्यावर झोपलेल्या भावाला बोलावण्यासाठी अपघातग्रस्त मुलगा जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.
दीपक गुत्तेदार असे मरण पावलेल्या मुलाचे नाव असल्याचे अक्कलकोट पोलिसांनी सांगितले. तो आठवीत शिकत होता तर त्याच्या वडिलांचे मैंदर्गी- दुधनी रस्त्यावर ढाबा आहे. सोमवारी दीपक याचा वाढदिवस होता. सकाळी साडेआठ वाजता तो घरातून भावाला बोलवण्यासाठी ढाब्याकडे मोटरसायकलवरून निघाला. वाटेत ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तो असताना समोरून येणाऱ्या जीपने त्याला ठोकर मारली. यात तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियाचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती.
पालकांनी हे टाळावे
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देताना पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबाबत शासनाने गंभीर कायदा केला असला तरी याकडे डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे. असा प्रसंग उडवल्यावर दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी पालकांनी दक्ष असावे असे आवाहन करण्यात येत आहे.