सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या प्रयत्नातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथे उभारण्यात आलेला ‘लोकशक्ती” साखर कारखाना मंद्रूपचे युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांच्या कंपनीच्या ताब्यात जाणार आहे.
मोहोळचे उद्योजक विजयराज डोंगरे यांचे स्वतःचा साखर कारखाना असावा असे स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नाला त्यांचे वडील व जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन मनोहरभाऊ डोंगरे यांनी पाठबळ दिले. अतिशय जिद्दीने त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 मैल येथे कारखान्यासाठी जमीन घेऊन उभारणी सुरू केली. कारखान्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यासमोर संकट उभा राहिले. या अडचणीतून कारखान्याचा गाळप शुभारंभ घेण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक उद्योजकांकडे हेलपाटे मारले पण मदत झाली नाही. त्यामुळे कारखान्याला आर्थिक मदत केलेल्या बँका कर्ज थकल्यामुळे कोर्टात गेल्या. कोर्टाने बँकाची देणी वसूल करण्यासाठी कारखान्याचा लिलाव जाहीर केला. मार्चमध्ये जाहीर झालेल्या लिलावामध्ये राज्यातील मान्यवर बारा कंपन्यांनी सहभाग नोंदवला. त्यात चार कंपन्या रिजेक्ट झाल्या. आठमधून प्रत्यक्ष लिलावच्या वेळी तीन कंपन्या हजर झाल्या. यामध्ये कोल्हापूरची गीतांजली, लातूरची देशमुख यांची शुगर कंपनी आणि मंद्रूपचे युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांची एप्राॅनडिस्टरलरी या तीन कंपन्यांचा समावेश होता. कोर्टाने कारखान्यासाठी 131 कोटीची बोली लावली. शेवटी मुगळे यांच्या कंपनीला लिलाव मंजूर झाला आहे. मुगळे यांनी लोकशक्ती कारखाना घेतल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्या नावाची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
मी एक साधा माणूस…
2007 साली मी एक साधा माणूस होतो. त्यानंतर व्यवसाय व इतर मार्गातून स्वतःच कंपनी स्थापन केली व आपला एक कारखाना असावा असे मला वाटू लागले. त्यातून मी याचा शोध घेऊ लागलो. माझ्या या व्यवहारातून बँकांनी मला अडीचशे कोटीची हमी दिली, त्यातून मी या लिलावात भाग घेतला. समोरच्या कंपन्या पाहता मी खूप छोटा माणूस होतो. पण अंतिम बोलीत मला यश आल्याचे समाधान आहे. अजून याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच याबाबत बोलू असे युवा उद्योजक मुगळे यांनी सांगितले.

More Stories
जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीपेक्षा जयकुमार गोरे यांच्या पॅटर्नची चर्चा
स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लागला मार्गी
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती