सोलापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षण आत्मसात केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपल्या गावातच व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
देशात स्थापन करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. मंद्रूप येथील शासकीय आयटीआयमध्ये कौशल्य केंद्राचे उद्घाटनाचा ऑनलाइन लाईव्ह कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत घुले, आयटीआयचे प्राचार्य करुणा ठाकरे यांच्यासह आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर जिल्हयातील 24 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रावर हा कार्यक्रम झाला. मंद्रूपमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन काळातच आपल्याला कोणत्या विषयाचे कौशल्य प्राप्त करायचे आहे त्याचे ज्ञान घेणे गरजेचे असून त्यावर आधारित आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःसह आपल्या गावाचा विकास साधावा. अत्यंत मन लावून व परिश्रम घेऊन अभ्यास करावा. स्वतःचे आत्मनिरीक्षण करून आपल्या स्वतःमधील उणीवा शोधाव्यात व त्यावर परिश्रम घेऊन सुधारणा करावी व कौशल्य आत्मसात करावे असे सांगितले. या कार्यक्रमास लोकमंगल समूहाचे मनीष देशमुख , रोजगार स्वयंरोजगार सहायक आयुक्त नलावडे , सरपंच अनिता कोरे , महात्मा फुले, लोकसेवा महाविद्यालय , माध्यमिक विद्यालयचे प्रतिनिधी व विद्यार्थी ,शासकीय आय टी आय मंद्रूप प्रशिक्षणार्थी व सर्व स्टाफ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण पुतळे यांनी केले.
जिल्हायात 24 केंद्र…
अक्कलकोट तालुक्यामध्ये नागणसूर, जेऊर, बार्शी तालुक्यामध्ये पांगरी, मळेगांव, करमाळा तालुक्यामध्ये जेऊर, वांगी, माढा तालुक्यामध्ये टेंभूर्णी, मोडनिंब, माळशिरस तालुक्यामध्ये यशवंतनगर, माळीनगर, खंडाळी, मंगळवेढा तालुक्यामध्ये संत दामाजीनगर, भोसे, मोहोळ तालुक्यामध्ये कुरूल, पेनूर, पंढरपुर तालुक्यामध्ये करकंब, कासेगांव, टाकळी (ल), सांगोला तालुक्यामध्ये महूद बु, कोळा, उत्तर सोलापुर तालुक्यामध्ये नानज, बीबीदारफळ, दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कुंभारी, मंद्रुप अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी शासकीय आयटीआय तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले