– राजकुमार सारोळे
सोलापूर : राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या दौऱ्यामुळे आरटीओ अधिकारी टेन्शनमध्ये असल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या तोंडावर परिवहन कार्यालयाचा मोठा लवाजमा दौऱ्यावर आल्याने त्यांच्या व्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
परिवहन आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर विवेक भिमनवार यांनी राज्यातील अपघात कमी करण्याची मोहीम हाती घेतली. राज्यभर विविध उपक्रम घेण्यात आले, त्यात यश कितपत आले माहित नाही. पण समृद्धी महामार्गावरील अपघात प्रकरणी नुकतेच दोन आरटीओचे अधिकारी निलंबित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त भीमनवार यांनी आता पुन्हा दौरा जारी केला आहे. आयुक्त कार्यालयातील तीन पथके या दौऱ्यात आहेत. यातील 13 अधिकाऱ्यांची व्यवस्था लावण्यात आरटीओ अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. गेल्या महिन्यात या पथकाचा महाबळेश्वरला मुक्काम होता. आता त्यानंतर 21 ऑक्टोबर पासून हे पथक कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहे. या पथकातील अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात मोठी यंत्रणा कामाला लावली जात असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यातून फलनिष्पत्ती काय होणार? हे मात्र अजून समजून आलेले नाही.
बदल्या रखडल्या…
आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्या दोन वर्षापासून रखडल्या आहेत. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी कर्मचाऱ्यांची बदल्याची यादी तयार केली होती. दरम्यान सरकार बदलले व त्यांची बदली झाली. त्यानंतर ही फाईल पुढे सरकलीच नाही. त्यानंतर संभाजीनगरमधील प्रकरण बाहेर आले. बदलीच्या प्रतीक्षेतील अनेक कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. पण याकडे कोणीच लक्ष देत नसल्याबद्दल ओरड होत आहे. अशी अनेक मोठी कामे प्रलंबित असताना परिवहन आयुक्तांचा हा अचानक दौरा कशासाठी? अशी चर्चा आता आरटीओ अधिकाऱ्यांत रंगली आहे.