1. पुणे: गुन्ह्यातील कागदपत्रे देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन 20 हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील भिगवण पोलीस ठाण्यातील फौजदार आणि वकीलाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

  2. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई भिगवण पोलीस ठाण्याच्यासमोर रविवारी (दि.22) केली आहे. भिगवण पोलीस ठाण्यातील फौजदार प्रवीण सुग्रीव लोकरे (वय 53, रा. कुमठानाका, सोलापूर) आणि अॅड. मधुकर विठ्ठल कोरडे (वय 35 रा. अहमदनगर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 41 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांना धडक देणाऱ्या वाहनाची इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी फौजदार प्रवीण लोकरे व अॅड. मधुकर कोरडे यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली. तक्रारदार यांना कागदपत्रे देण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्यातील फौजदार प्रवीण लोकरे व अॅड. कोरडे यांनी 30 हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती 20 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने रविवारी भिगवण पोलीस ठाण्यासमोर सापळा रचला. अॅड. कोरडे यांना फौजदार लोकरे यांच्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले तर फौजदार लोकरे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. दोघांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *