तुळजापुरला जाण्यासाठी कर्नाटकातून भाविकांची रीघ
दुष्काळी स्थितीमुळे तरुणाईबरोबरच आबाल- वृद्धांचा ओढा वाढला

सोलापूर : दसरा संपल्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तुळजापूरची ओढ लागली आहे. यंदा दुष्काळी स्थितीमुळे तुळजापूरच्या मार्गावर कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे.
दसरा झाल्यानंतर यंदा कोजागिरी पौर्णिमा लवकर आली आहे. त्यामुळे सणाच्या दुसऱ्या दिवसापासून भाविक तुळजापूरच्या मार्गाला लागले आहेत. गुरुवारी विजयपूर महामार्गावरून कर्नाटकातून भाविकांचा लोंढा सुरू झाला आहे. धुळखेड, इंडी, मंद्रूप, भंडारकवठे, औराद परिसरातून भाविक मोठ्या प्रमाणावर पायी चालत तुळजापूरच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर दानशूर व्यक्तींकडून अन्नदान व महाप्रसाद वाटपाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात भाविकांच्या सोयीसाठी अन्नदानाचे मोठे काम सुरू झाले आहे. मंद्रूप येथील सूर्या इन्फ्रास्ट्रक्चरचे विलासराव हेमंत चव्हाण यांनी बसवनगर येथे महाप्रसाद वाटप सुरू केले आहे. सूर्या इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन व विलासराव यांचे वडील हेमंत चव्हाण यांच्याहस्ते अन्नदानाचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर हद्दीनंतर भाविकांना मोफत महाप्रसाद मिळत नाही सोलापूर तुळजापूर महामार्गावर अनेक ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर तुळजापूर महामार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. शनिवारी कोजागिरी असल्यामुळे शुक्रवारी सोलापुरातूनही मोठ्या प्रमाणावर भाविकांचा महापूर तुळजापूरच्या दिशेने जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर व धाराशिव प्रशासनातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.