सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सीईओंच्या मीटिंग हॉलमध्ये पहिल्यांदाच रविवारी मोकळा श्वास घेतला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर जुन्या इमारतीत हवाबंद असलेला कक्ष नव्याने करून खुला केल्याने अधिकारी आनंदित झाले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेची इमारत स्थापनेच्या काळातील म्हणजे जवळपास 1965 साली बांधलेली आहे. दगडी इमारत जीर्ण दिसू लागल्यावर या इमारतीचे सौंदर्य खुलवण्यासाठी समोरच्या बाजूला अल्युमिनियम पत्राचे रेलिंग देऊन सौंदर्य खुलवण्यात आले होते. पण हे काम करताना खिडक्या सोडण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे इमारतीच्या आतील खोल्यांमध्ये मोकळी हवा येत नव्हती. बरेच दिवस हवा कोंडून राहिल्यामुळे इमारतीच्या आतील कक्षांमधून एक वेगळाच दर्प बाहेर पडत होता. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांच्या कक्षातील घुसमट त्यांना जाणवली. त्यामुळे कक्ष बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला. उपलेखाधिकाऱ्यांचा कक्ष व समोरील त्यांच्या कार्यालयाची जागा सीईओंच्या दालन व मीटिंग हॉलसाठी निवडण्यात आली. यासाठी गेले दोन महिने काम सुरू होते. या हॉलचे काम पूर्ण झाल्यामुळे रविवारी सीईओ आव्हाळे यांनी नव्या दालनात मीटिंग घेतली. मोकळ्या वातावरणात मीटिंग झाल्याने अधिकारी खुश झाले.