सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागातही काही शिक्षकांनी बोगस मान्यता सादर केल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
टप्पा अनुदान मंजूर झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी बोर्डाकडे फाईली पाठविण्याचे काम सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने व कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने हे काम मागे पडले आहे. अशात रजिस्टर गायब झाल्याचे प्रकरण पुढे आले होते. या संबंधाने संबंधितावर आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातील शालार्थ आयडीच्या काही फायली प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. याबाबत विचारले असता शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले म्हणाले की प्राथमिक शिक्षण विभागातील मागील काही रजिस्टर आढळून येत नसल्याचे दिसून येत आहे. अशात खाजगी प्राथमिक शाळांमधील 2012 नंतरच्या मान्यता संशयास्पद वाटत आहेत. या मान्यतांची पडताळणी करून बोगस मान्यता सादर केलेल्या संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यात काही चूक होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागात बोगस मान्यता सादर करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर लवकरच संकट कोसळणार आहे.