सोलापूर : देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अंत्यसंस्काराची आठवण करून देणाऱ्या मंद्रूपच्या जनावराच्या दवाखान्याचा कायापालट होणार आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी या दवाखान्याबाबत माहिती मागवली आहे.
मंद्रूप हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. या गावाच्या कक्षेत शेतकऱ्यांचे दुभते पशुधन मोठे आहे. या पशुधनाची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा जनावराचा दवाखाना आहे. परंतु अलीकडच्या काळात येथील जनावराच्या दवाखान्यातील सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या या दवाखान्यामध्ये पशुवैद्यक नाही. हत्तूरच्या पशुवैद्यकावर या दवाखान्याचा कारभार सुरू आहे. त्यामुळे अनेकवेळा पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. येथील नागरिकांनी ही बाब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या निदर्शनाला आणली. त्यांनी तात्काळ याची दखल घेतली आहे. भंडारकवठेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांच्याकडे या चिकित्सालयाचा पदभार देण्यात येणार आहे.
मंद्रूपच्या जनावराच्या दवाखान्याचा इतिहास मोठा आहे. 1984 च्या काळात या ठिकाणी डॉ. महिंद्रकर कार्यरत होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ते जनावरांची तपासणी करीत व शेतकऱ्यांना जनावरांची काळजी कशी घ्यावी? याबाबत मार्गदर्शन करीत. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या सतत संपर्कात राहायचे. या दवाखान्याच्यासमोर असलेल्या निवासस्थानी ते मुक्कामाला होते. त्याकाळी त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन संच घेतला होता. गावात अशा चारच व्यक्तींकडे दूरदर्शन संच होते. सायंकाळी शेतकऱ्यांचे कार्यक्रम ते या दूरदर्शन संचावर दाखवीत असत. त्यामुळे त्यांच्या घरासमोरील अंगण नेहमी शेतकऱ्यांनी भरलेले असायचे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या झाली. या घटनेनंतर अख्खा देश शोकाकुल झाला होता. त्यांच्या पार्थिवावर झालेला अंत्यसंस्कार दूरदर्शनवर दाखविण्यात आला होता. डॉ. महिंद्रकर यांच्या दूरदर्शन संचावर मंद्रूपकरांनी इंदिरा गांधी यांचे अखेरचे दर्शन घेतले होते. दूरदर्शनवरील अंत्यसंस्कार पाहून अनेक नागरिक ढसाढसा रडले होते. महामार्गाशेजारी असलेल्या या जनावराच्या दवाखान्यासमोरून जाताना अनेकांना ती आठवण आल्याशिवाय राहत नाही.पण आज या दवाखान्याची ही अवस्था पाहून अनेक जण नाराजी व्यक्त करताना दिसतात. या दवाखान्याची ही कहाणी ऐकून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर भावुक झाले व त्यांनी तातडीने या दवाखान्याचा कायापालट करण्याबाबत माहिती मागवली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले असून लवकरच ते या दवाखान्याला भेट देणार आहेत.