राजकुमार सारोळे
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या एका माजी अध्यक्षाला कुंभारीकराच्या पाहुणचारामुळे घाम फुटल्याची घटना नुकतीच घडल्याची चर्चा आहे. टक्केवारीचा हिशोब न जमल्याने अडचणीत आलेल्या ‘या” माजी अध्यक्षाची आता चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल वर्षांपूर्वीच समाप्त झाला आहे. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे. पण तरीही पदाधिकाऱ्यांच्या मागील कार्यकाळावरून राजकीय वर्तुळात बरीच वेगवेगळी चर्चा सुरू असते. कोरोना महामारीनंतरचा जिल्हा परिषदेतील काळ बराच गाजला होता. समाजकल्याण व इतर निधीवरून पदाधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप झाला होता. यावरून बरेच वादळ उठले होते. काळाच्या ओघात आता ही चर्चा संपली असली तरी आत्ता पुन्हा एका घटनेने याला तोंड फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरे तर कुंभारीकर ग्रामदैवत श्री गेनसिद्धचे भक्त. सोलापूर शहराचे विस्तारीकरण झाले तरीही प्लॉटिंग व इतर व्यवसायापासून अलिप्त राहून आपली शेतीच बरी व आपली भक्ती सांभाळत जिल्हा परिषदेतील राजकारणात लक्ष घातले होते. झेडपीत असताना एका मित्राने अध्यक्ष ओळखीचे आहेत तर काम द्या अशी गळ घातली. मित्राच्या इच्छेखातर कुंभारीकरांनी ‘त्या” अध्यक्षांकडे शब्द टाकला. अध्यक्षांनी ठरलेली टक्केवारी घेतली पण नंतर कामच दिले नाही. आता कार्यकाल संपला तरीही कामही नाही व टक्केवारीचे पैसेही परत मिळाले नाहीत म्हणून ‘त्या” मित्राने कुंभारीकरांकडे तगादा लावला. कुंभारीकरांनी ‘त्या” अध्यक्षाला वारंवार याबाबत बोलणी केली. देतो देतो असे म्हणून अध्यक्षांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शेवटी वैतागलेल्या कुंभारीकरांनी ‘त्या” अध्यक्षांना आपल्या घरी पाहुणचाराकरता आणले. कुंभारीकरांच्या पाहुणचाराची पद्धत पाहून ‘त्या” अध्यक्षांची पाचावर बसली. शेवटी राजकीय वजन वापरून मुदत मागून अध्यक्षांने एसटीने कसेतरी आपले गाव गाठले. पण या प्रकाराची चर्चा आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
काका साठे यांचा आदर्श…
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी 40 वर्षे राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. पण नेकीचा आपला धर्म सोडला नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारण व गटतट न पाहता अनेक गावांच्या विकासाची कामे त्यांनी केली. आपल्या संस्थामध्ये त्यांनी गोरगरिबांना एक रुपया न घेता नोकरीला लावले. टक्केवारीचा विषय आल्यावर त्यांनी हीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पण त्यांचा आदर्श जिल्हा परिषदेत ननव्याने आलेले काही पुढारी विसरले आणि अशा चक्रव्यूहात अडकल्याचे दिसून येत आहे.