- सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत वारंवार तक्रार करणारे आहेत तरी कोण? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या सेनेचे मीडिया सेल प्रमुख आशिष शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी यांनी तिर्हे प्राथमिक केंद्राला भेट देऊन तेथील रजेवर असलेले डॉ. गोडसे व ड्युटीवर असलेल्या डॉ. राऊतराव यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या भेटीत तपासणीवेळी औषध साठा नोंदवही उपलब्ध नसल्याचे सीईओ आव्हाळे यांनी नमूद केले आहे. मग औषध साठ्याची जबाबदारी कोणाची होती? या ठिकाणी औषध निर्माता म्हणून नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्यांने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्यालयात प्रतिनियुक्ती मिळवली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांची एकाच ठिकाणी नियुक्ती आहे. त्यांनी रुग्णसेवा किती केली आहे याची खातरजमा न करता नेहमीच्याच तक्रारदाराच्या तक्रारीवरून सीईओ आव्हाळे यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली व चौकशी सुरू करण्यात आले आहे. वास्तविक येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांबाबत ग्रामस्थांची कोणतीच तक्रार नाही. यापूर्वीही तत्कालीन मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांच्याकडे याच माणसांनी तक्रार केली होती. या तक्रारीवर स्वतः स्वामी आरोग्य केंद्रात आले होते. त्यांनीही अशाचप्रकारे कारवाईचे आदेश दिले होते. नंतर वस्तूस्थिती निदर्शनास आल्यावर त्यांनी कारवाई मागे घेतली होती. आत्ताही हेच घडत आहे. आव्हाळे यांनी या आरोग्य केंद्रातील पूर्वीचा इतिहास तपासून पाहुनच वारंवार तक्रार कोण करतंय? तक्रारदारांचा या गावाशी संबंध काय? वारंवार तक्रार करण्यामागे त्यांचा उद्देश काय? याची पडताळणी करावी व त्यानंतरच कारवाईचे पुढील पाऊल उचलावे अशी मागणी केली आहे. याबाबत 11 ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनावर अद्याप कोणतीच चौकशी झालेली नाही.
वारंवार तक्रार का?
जिल्हा परिषदेत नवीन अधिकारी आले की तिर्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांबाबत तक्रार केली जाते. तक्रारदार वैयक्तिक राग काढण्यासाठी असे कृत्य करत असून यामुळे गावाची बदनामी होत आहे. पण यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. वास्तविक हे गाव महामार्गावर असल्याने प्रशासनातील कोणताही अधिकारी व कर्मचारी बेजबाबदारपणे वागताना दिसून येत नाही. येथून पुढे जाताना प्रत्येक अधिकारी भेट देऊन जातात. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी दक्ष असतात ही बाजू प्रशासनाने समजून घ्यावी. येथील डॉक्टरांनी कामात हायगय केली असेल तर जरूर कारवाई करावी. कामचुकारांनाही पाठीशी घालू नये. औषध नोंदवहीच्या घोळ घालणाऱ्यावर अवश्य कारवाई करावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे त्यामुळे सीईओ आव्हाळे यांनी यामागची दुसरी बाजूही तपासणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.