सोलापूर : कलेक्टर यांचा ड्रायव्हर असल्याची बतावणी करून कलेक्टर अंगठ्या भेट देणार आहेत असे सांगून सोनाराकडून अंगठ्या पळविणाऱ्याला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून 4 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक दिवसाच्या शोधानंतर अखेर त्या आरोपीला अटक केली आहे. अशा प्रकारे मोठ्या पदावरील लोकांची नावे सांगून सोन्याची दागिने पळवून नेण्यात तो एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. शेख बाबू शेख छोटुमिया (वय 40 वर्ष, रा.रशीद टेकडी, नई आबादी, ता. भोकर जि.नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि.17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.35 वा. च्या सुमारास या गुन्ह्यातील फिर्यादी अय्याज मकबुल मुल्ला यांचे विजापूर रोड येथे निहाल ज्वेलर्स आहे. एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या शॉपमध्ये आला. त्याने आपण कलेक्टरच्या गाडीचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले. कलेक्टरसाहेब हे मिटींगसाठी आलेल्या लोकांना सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट गिफ्ट करणार आहेत, बतावणी केली.
त्याने मुल्ला यांच्याकडुन 8 सोन्याच्या अंगठ्या व 3 सोन्याचे लॉकेट असे सुमारे 67.11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले आणि त्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये बिल देतो म्हणून आणून पळून गेला. याबाबत मुल्ला यांनी विजापुर नाका पोलीसात तक्रार दिली. गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे यांनी गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.
सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीास उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकाने विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली व आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर आरोपी शेख बाबु शेख छोटुमिया (वय 40 वर्ष, रा.रशीद टेकडी, नई आबादी, ता. भोकर जि.नांदेड) यास चिखली जि.बुलढाणा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने फसवणूक केल्याचे कबुल केले. गुन्ह्यातील फसवणूक झालेले 67.11 ग्रॅम वजनाचे सोने त्याची किंमत 4,25,623 /- रुपये (चार लाख, पंचवीस हजार, सहाशे तेवीस रुपये) हस्तगत करण्यात आली आहे.
- ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पाटील, पोसई अल्फाज शेख व पथकातील पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, अजिंक्य माने, धिरज सातपुते, वसीम शेख, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, चालक सतिश काटे व सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.या गुन्ह्यातील आरोपी शेख याने यापूर्वी अनेक ठिकाणी अशाच प्रकारे जिल्हाधिकारी, तहसीलदार, न्यायाधीश यांचा चालक असल्याचे सांगून सोन्याचे दागिने पळवून नेल्याच्या घटना केल्या आहेत. शेख हा अनेक गुन्ह्यांमध्ये वॉटेंड होता. अखेर सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले आहे.