सोलापूर : जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या डाक बंगल्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या डाक बंगल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मालकीची माळशिरस तालुक्यात माळशिरस व फडतरी, करमाळा तालुक्यात करमाळा, जेऊर, कात्रज, चिखलठाण, सांगोला, पंढरपूर, अक्कलकोट, मंद्रूप अशा महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे 11  विश्रामधाम आहेत. पंढरपूर व अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक व सरकारी कर्मचारी येत असतात. झेडपीच्या मालकीच्या पंढरपूर येथील  विश्रामधामाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याच धर्तीवर अक्कलकोट येथील विश्रामधामचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या अधिकारी व भाविकांची चांगली सोय होणार आहे. त्याचबरोबर करमाळा तालुका परिसरात उजनीचे बॅकवाॅटर आहे. या ठिकाणी हिवाळ्यात फ्लेमिंगो व इतर वेळी अनेक पक्षी येतात. बोटिंग व धरणाचा परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. माळशिरस तालुक्यात फडतरी येथील गुप्तलिंग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. नेमका याचाच फायदा घेण्यासाठी करमाळा व माळशिरस तालुक्यातील विश्रामधामाचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महामार्गाचा विकास झाल्यामुळे सांगोला, मंद्रूप डाक बंगल्याचीही गरज वाढली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे चार्जेस घेऊन हे विश्रामधाम मेंटन करता येऊ शकतात. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी जिल्हा नियोजनमधून या डाक बंगल्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे .त्यानंतर या डाक बंगल्याचा पर्यटनासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल, असा विश्वास कोहिणकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *