सोलापूर : आठवते का तुम्हाला…गेल्या वर्षी दिवाळीत पावसाची जोरदार कोसळदार होती पण यंदा मात्र पावसाने गुंगारा दिल्याने दुष्काळी स्थिती आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन आणि पहाटेच्या दरम्यान पडणाऱ्या थंडीमुळे दुष्काळाची छाया गडद होत असतानाच आता हवामान खात्याने इशारा दिला आहे. दिवाळी तीन दिवसावर येऊन ठेपलेली असताना यादरम्यान राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अशी स्थिती गेल्या दोन दिवसापासून सुरू झाली आहे. या काळात काही ठिकाणी पाऊसही बरसणार आहे. पाऊसदेखील यंदा दिवाळी साजरा करण्यासाठी आपली हजेरी लावणार आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या जोमदार वाढीसाठी अवकाळी पावसाची गरज भासणार आहे. अवकाळी पाऊस हा नेहमीच शेती पिकांसाठी घातक ठरतो. मात्र यंदा परिस्थिती खूपच बिकट असल्याचे पाहायला मिळत आहे.पावसाळ्यात चांगला समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर याचा विपरीत पपरिणाम झालाय. कमी पावसामुळे खरीप हंगाम तर हातचा गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाची आतुरता लागून आहे. जर येत्या काही दिवसांत मोठा अवकाळी पाऊस बरसला तर याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होऊ शकतो सोबतच यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मिटेल असा आशावाद व्यक्त होत आहे.पण जर अवकाळी पाऊस बरसला नाही तर राज्यातील बहुतांशी भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काही ठिकाणी तर हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होतील असे भीषण चित्र तयार होण्याची भीती आहे.
आता राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सहा नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस म्हणजे गुरुवारी 9 तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असल्याचे सांगितले आहे. या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचा गारवा कमी होईल त्याशिवाय दुपारचे तापमान काहीसे अधिक राहील, असे हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.