सोलापूरमहाराष्ट्र

काजूकरीमध्ये रंग घालणाऱ्या तीन हॉटेलवर कारवाई

दिवाळीमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थ घेणे टाळा

  • सोलापूर : अन्नपदार्थात कृत्रिम रंग घालणे बेकायदेशीर आहे. तरीही सोलापुरातील काही महत्त्वाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजीमध्ये रंग टाकण्याचे प्रकार सुरू आहेत अशी तक्रार आल्यावर तीन हॉटेलची तपासणी केल्यावर काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग घालण्यात आल्याचे दिसून आले. अशा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीत अन्नपदार्थ खरेदी करताना रंग घातलेले पदार्थ घेऊ नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी केले आहे.

सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई करुन माल जप्त केला आहे.  31 ऑगस्ट  ते 7 नोव्हेंबर या कालावधीत तेल व वनस्पती- तेलाचे एकूण 5 नमुने व वनस्पतीचे 2  नमुने,  दूध या अन्न पदार्थाचे 55 नमुने व दुग्धजन्य पदार्थाचे 18 नमुने, रवा, मैदा, आटा व इतर असे एकूण 22 नमुने तसेच तुप, खवा, पनीर- या अन्न पदार्थाचे एकूण 11 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी सांगितले आहे.

या मोहिमेत  18 सप्टेंबर रोजी बेगमपुर (ता. मोहोळ) येथील मे. बॉम्बे स्विट मार्ट व बेकरी या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी- 40 किलो, सुमारे 10 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. 10 ऑक्टोबर रोजी मे. उत्तम चौधरी, भवानी पेठ, सोलापूर या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी- 68 किलो, किंमत रु. 17 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे .  16 ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी (ता.माढा) येथील मे. भगवान राम पालिवाल या पेढीवर धाड टाकून स्पेशल बर्फी- 103 किलो, किंमत 25 हजार 750 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच 2 नोव्हेंबर रोजी कोंढारपट्टा (माळशिरस) येथील मे. शौर्य गुळ उद्योग या ठिकाणी धाड टाकून गुळ व साखर (अपमिश्रक)- 918 किलो, किंमत 35 हजार 125 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. 7 नोव्हेंबर रोजी टेंभुर्णी (ता.माढा) येथील मे. ध्रुव एजन्सी या ठिकाणी धाड टाकून दुध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कंपनीचे व्हे पावडरचे एकूण 1 हजार 813 किलो सुमारे  1 लाख 59 हजार 640 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी सांगितले.

रंग वापरायला बंदी…

खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरायला बंदी आहे. गोड अन्नपदार्थांमध्ये काही अंशी नैसर्गिक रंग वापरायला परवानगी दिली जाते पण हॉटेलमधील भाज्या व आठवडी बाजारात विकणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये रंग वापरण्यास बंदी आहे. असे असतानाही अनेकजण खाद्यपदार्थ आकर्षित दिसण्यासाठी रंग वापरताना दिसतात. या कृत्रिम रासायनिक रंगाचा शरीरावर अपायकारक परिणाम दिसून येतो. सोलापुरातील तीन हॉटेलमध्ये काजू करी मध्ये लाल रंग वापरण्यात आल्याचे दिसून आले आहे. या हॉटेलवाल्यांना दंड करण्यात आला आहे. काजूकरी बरोबरच चायनीज पदार्थांमध्ये रंग वापरले जाते, जे शरीराला अपायकारक आहे. असे पदार्थ नागरिकांनी खाऊ नयेत. खाद्यतेलातही भेसळ आढळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button