सोलापूरजिल्हा परिषदपंढरपूर आषाढी यात्रा

पंढरीच्या स्वच्छता मोहिमेत झेडपीचे 250 कर्मचारी

सोलापूर : पंढरपुरातील आषाढी वारीची गर्दी हळूहळू ओसरू लागली आहे. गोपाळ काल्यानंतर वारकरी आपल्या घरी परततील. वारीच्या गर्दीमुळे झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेतर्फे सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषदेचे अडीचशे कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून अविरत कष्ट घेत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

यंदाच्या वारीला भाविकांची अलोट गर्दी झाली. मानाच्या दोन्ही पालखी मार्गावर जिल्ह्यातील आगमनापासून पंढरपुरापर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने सुविधा पुरविल्या. पालख्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, पावसापासून संरक्षण होण्यासाठी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरते चार्जिंग सेंटर ही सुविधा सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषदेने पुरवली. मुक्कामाच्या ठिकाणी दमलेल्या वारकऱ्यांचा क्षीण घालवण्यासाठी फूट मसाजर, स्वच्छतागृह, स्नानगृह या सोयींबरोबर आरोग्य विभागाची मोठी यंत्रणा लावण्यात आली होती. बीपी, शुगरचे वारकरी मोठ्या प्रमाणावर आले होते. सततच्या चालण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवला. त्यामुळे अशा वारकऱ्यांना आरोग्य विभागाचा मोठा आधार मिळाला. महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनीही चांगली सेवा बजावली. आषाढी वारीचा माझा पहिलाच अनुभव होता. वारकऱ्यांची स्वयंशिस्त पाहून मी भारावून गेलो. सर्वच यंत्रणेच्या मदतीने वारी यशस्वी झाली. पालखी सोहळा पुढे सरकल्यानंतर मार्गावरील ग्रामपंचायतीने लागलीच स्वच्छता मोहीम हाती घेतली. पालखी सोहळा येण्यापूर्वी व सोहळा गेल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे वारी निर्मल झाली. वारीचा पहिला अनुभव अविस्मरणीय होता. पंढरपुरात वारीनंतर महा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात जिल्हा परिषदेचे ही कर्मचारी सहभागी झाले आहेत, असे जैन यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची मिळाली थाप…

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी चांगले काम केले. वारकऱ्यांनी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले आहे. पावसाळी वातावरणामुळे यंदा प्रथमच वीस हजार वारकऱ्यांना रेनकोट देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. आषाढी वारीच्यानिमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबाबत सीईओ जैन यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button