सोलापूरन्यायालयशिक्षण

अक्कलकोटमध्ये भर पावसात शाळांची न्यायाधीशांकडून तपासणी; निकृष्ट पोषण आहार नष्ट करण्याचे आदेश

सोलापूर : उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ संभाजीनगर यांच्या जनहित याचिकाअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी नियुक्त समितीने मंगळवारी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांची भर पावसात अचानक तपासणी केली. या तपासणीत काही नगरपालिका शाळांमधील मूलभूत सुविधांच्या गंभीर त्रुटी समोर आल्या, तर जेऊर येथील जिल्हा परिषद शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती व विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी करत समितीची विशेष प्रशंसा मिळविली.

या समितीने अक्कलकोट तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळा व चार नगरपालिका शाळांना भेट देऊन स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षितता, अध्यापनाचा दर्जा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी तसेच विद्यार्थी सुरक्षेबाबत विविध 4 समित्याचे अमलबजावणीबाबत तपासणी व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधाबाबत पाहणी केली. नगर परिषद वरिष्ठ शाळा क्रमांक १ व प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल येथे स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा अभाव, काही धोकादायक वर्गखोल्या, शाळेच्या संरक्षण भिंतीलगत झालेले अतिक्रमण तसेच परिसरातील अस्वच्छता समितीच्या निदर्शनास आली. या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत समितीने संबंधित नगरपालिका प्रशासनास आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित प्रशासनाधिकाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून त्रुटी त्वरित दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जेऊर येथील जिल्हा परिषद कन्नड-मराठी शाळेने मात्र शैक्षणिक गुणवत्ता, संगणक शिक्षण, विद्यार्थ्यांची शिस्त, प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि समाधानकारक विद्यार्थी उपस्थितीमुळे समितीवर सकारात्मक छाप पाडली. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाचे समितीने विशेष कौतुक केले. स्वच्छतागृहासाठी जागेची कमतरता असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तातडीने सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेऊर येथील उर्दू शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी करण्यात आली तसेच सर्वच जिल्हा परिषद शाळेतील भेटीदरम्यान प्रधानमंत्री पोषण योजनेतील अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, खराब झालेल्या धान्याची तातडीने विल्हेवाट लावून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधितांना देण्यात आले. तसेच शिक्षकांनी वेळेचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक जबाबदारीने काम करावे, असेही समितीने सांगितले.
या तपासणीवेळी समितीचे अध्यक्ष तथा माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी, तहसीलदार जयश्री पंचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी पी. आर. मामड्याल, पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. पवार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे, प्राथमिक विभागाचे प्रतिनिधी बापूराव जमादार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button