सोलापूर : नवरात्र महोत्सवातील बापू आणि मालकांच्या ‘गरबा दांडिया” नंतर दक्षिण सोलापुरात आता दिवाळीत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांचा ‘ताई चषक” लक्ष वेधून घेत आहे.
विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी दक्षिण सोलापुरात मात्र इच्छुकांमध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे. नवरात्र काळात माजी आमदार दिलीप माने यांनी महिलांसाठी दांडियाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे पोस्टर जुळे सोलापुरात झळकल्यावर विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख यांनीही ‘गरबा दांडिया”चे आयोजन केले. या दोन्ही कार्यक्रमाचे पोस्टर एकमेकांसमोर झळकल्यानंतर जुळे सोलापूरकरांची मात्र मोठीच करमणूक झाली होती. आता सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. अशात पुन्हा जुळे सोलापुरात ‘ताई चषक”चे पोस्टर झळकले आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा डीसीसी बँक, मार्केट कमिटीचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांची जिल्ह्यात लोकप्रियता मोठी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून त्यांच्या नावाची दक्षिण सोलापुरात मोठी चर्चा आहे. मुळातच हसापुरे हे जिल्ह्यातील राजकारणातील सर्वपक्ष मित्र म्हणून ओळखले जातात. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, मार्केट कमिटी, गावातील सोसायट्या व ग्रामपंचायतच्या निवडणुका असो त्यामध्ये हसापुरे यांचे कार्यकर्ते नाहीत असे होणारच नाही. जिल्ह्यातील कोणत्याही वरिष्ठ पदाची निवडणूक होत असताना ज्यांना संख्याबळ कमी पडते, अशा राजकारण्यासाठी हसापुरे यांच्या मैत्रीची मोठी मदत होत असते. हे जिल्ह्यातील आजपर्यंतच्या राजकारणातील सत्य आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा दुसरा दाखला देण्याची गरज नाही.
दक्षिण सोलापुरात इच्छुकांची भली मोठी संख्या असली तरी बापू, मालकानंतर हसापुरे यांचा नंबर लागतो. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आयोजित केलेला ‘ताई चषक” हा जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी महत्त्वाचा आहे. या चषकला मोठा प्रतिसाद मिळत असून खेळामध्ये राजकारण नाहीच अशी प्रतिक्रिया तरुणांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे हसापुरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेला चषकाच्या कल्पकतेला तोड नाही, अशी चर्चा राजकारण्यांमध्ये रंगली आहे. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी ‘ताई चषका”ची जोरदार ब्रॅण्डिंग होत आहे.