सोलापूर: जिल्ह्यात ढगाळी हवामान निर्माण झाल्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी सुखावला आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचे लगबग सुरू झाली आहे.
हवामान विभागाने राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापुर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धारशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने वर ठेवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात सर्वत्र ढगाळे हवामान होते. सकाळी 11 नंतर काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र दिसून आले पण हवेतील उखाडा पाहता जिल्ह्यात कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होईल असे वातावरण आहे. पाऊस झाला तर रब्बी ज्वारीला पोषक ठरणार आहे त्याचबरोबर काही ठिकाणी गावाची पेरणी सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी मातीची ओटी भरावी म्हणून कोरड्या रानातच पेरणी केली आहे यालाही या पावसाचा फायदा होणार आहे. द्राक्ष, तूर, डाळिंब अशा पिकांना मात्र या हवामानाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू केली आहे.