एक रुपयाची कोणीतरी गडबड करावी मग आहे माझ्याशी गाठ
झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी यासाठी हा दिला इशारा

सोलापूर :जिल्हा परिषदेच्या कामामध्ये कोणी एक रुपयाची गडबड केल्यास त्यांची माझ्याशी गाठ आहे ,असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिवाळीच्या काळात जिल्हा परिषदेच्या कामकाजात झालेल्या बदलाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण अलीकडे कमी झाले आहे ग्रामपंचायत विभागाकडे 2000 तक्रारी आल्या त्यापैकी 697 तक्रारी निर्गत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याने सुनावणी व तपासणी करूनच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती येण्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांना आठवड्यातून दोन बैठका घेऊन प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चर्चा करून नियोजित कामांचे नियोजन करून अहवाल देण्याबाबत सुचित केले आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेतल्याने त्यांच्या कामात सुधारणा होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण कोणाला त्रास देण्यासाठी नाही तर कार्यालयीन टिप्पणी व कामकाजात सुधारणा होण्यासाठी अक्कलकोट व पंढरपूर येथे निवासी स्वरूपात हे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्याचा विकास हाच ध्यास घेऊन एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून कामकाज सुरू आहे. स्वच्छ भारत मिशनच्या कामात सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात आघाडीवर आहे. चार महिन्यात 3236 वैयक्तिक शौचालय व 138 सार्वजनिक शौचालयाचे बांधणी झाली आहे. 809 गावे ओडीएफ प्लस मध्ये आलेली आहेत. यंदाची टंचाई लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करण्याचे काम सुरू आहे.
आरोग्य विभागातील 56 लाखाच्या छपाई टेंडरबाबत विचारले असता माझे सर्व कामांवर लक्ष आहे. कोणीही एक रुपया गडबड करणार नाही याची मला खात्री आहे. जर कोणी असे धाडस केले तर मग त्यांची माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवावे असा इशारा त्यांनी दिला. ‘मी ॲक्शन मोडमध्ये नाही, अडचणी कशा कमी होतील याकडे लक्ष देणार आहे. कारवाई, चौकशामध्ये वेळ जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यावर माझा भर असतो” असे आव्हाळे यांनी सांगितले