सोलापूर: प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या फौजदार विक्रमसिंह रजपूत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांचे नाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद झाले आहे.

तक्रारदारास दोन लाख लाचेची मागणी करून एक लाख स्वीकारण्याची तयारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फौजदार विक्रमसिंह रजपूत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली. तक्रारदाराच्या मित्रावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार रजपूत यांच्याकडे आहे. यापूर्वी तक्रारदाराच्या मित्रावर ॲट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. यानुसार सीआरपीसी 107 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी फौजदार रजपूत याने स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने तक्रारदाराकडे दोन लाखाची लाच मागितली. त्यानंतर एक लाखावर तडजोड केली. पडताळणीत हे निष्पन्न झाल्यानंतर फौजदार रजपूत याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार शिरीष सोनवणे, नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, नरोटे, जाधव, पोलीस शिपाई किणगी, श्याम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

यात विशेष धक्कादायक बाब म्हणजे फौजदार रजपूती यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक माने यांचे नाव घेतले आहे. पदोन्नतीवर यापूर्वीच त्यांची बदली झाली आहे. तरीही फौजदार रजपूतने त्यांचे नाव का घेतले? हा विषय ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *