सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेशआण्णा पाटील यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी प्रदान केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारसीनुसार प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी ही निवड केली आहे. वयाच्या 19 व्या वर्षापासून सुरेशआण्णा पाटील हे भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे भवानीपेठेत भाजपाच्या वाढीला चालना मिळाली आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणात भाजपला भवानी पेठ भाजपा असे नावही त्यांनी निर्माण करून दिले आहे. माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली सुरेशअण्णा पाटील आजपर्यंत भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत सलग वर्षे 25 नगरसेवक, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, सभागृहनेता, स्थायी समितीचे सभापती, जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समितीचे सलग पाच वर्ष सदस्य राहिले असून त्यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये पहिल्यांदाच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांची वर्णी लागली आहे.
माझी काम करण्याची पद्धत, संघटन कौशल्य, सगळ्यांना सामावून घेण्याची हातोटी व विकासात्मक धोरणाला प्रोत्साहन देण्याच्या कामगिरीमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली आहे. याचं सोनं करून दाखवणार आहे. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याबरोबरच इतर समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी माझे नेहमीच योगदान राहिले आहे. यापुढेही ते राहणार असल्याचे निवडीनंतर बोलताना सुरेशअण्णा पाटील यांनी सांगितले. निवडीचे वृत्त कळताच सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी निवडीनंतर सुरेशअण्णा पाटील यांना शुभेच्छा दिल्या.