-
सोलापूर : जिल्हा परिषद प्रशासनाची शिस्त कायम ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या ॲक्शन मोडवर आल्या असून कार्यालयीन तपासणीत गैरहजर आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यापासून कार्यालयीन शिस्तीवर भर दिला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी सीईओ मनीषा आव्हाळे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. पण या काळात कार्यालयातील हजेरी तपासण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या. स्वीय सहाय्यकानमार्फत प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी त्यांनी जाणून घेतली होती. स्वीय सहाय्यकाने कार्यालयीन वेळेत प्रत्येक विभागात जाऊन फोटो सेशन केले होते. या काळात जागेवर नसलेल्या कर्मचाऱ्यांना बिन पगारी करण्याचे त्यांनी आदेश प्रशासनाला दिले होते. त्यावरून प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी त्या काळातील गैरहजर कर्मचाऱ्यांची यादी तयार करून संबंधित कर्मचाऱ्यांची त्या दिवशीची हजेरी बिनपगारी केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनो सावधान…! दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आजही तुम्ही निवांतपणे ऑफिसला जायचा विचार करीत असाल तर तुम्हाला बिनपगारीचा फटका बसू शकतो. त्यामुळे आपली कामे लवकर आटपून वेळेत कार्यालयात हजर व्हा, अन्यथा पुन्हा अशी तपासणी होऊ शकते अशा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.