सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोरेगाव (ता. उत्तर सोलापूर) परिसरातील होटेल पूनम (पूर्वीचे नाव हॉटेल मूनलाईट) या ठिकाणी रविवारी टाकलेल्या धाडीत दारूची पार्टी करणाऱ्या हॉटेल मालकासह चार मद्यपी ग्राहकांना न्यायालयाने सदोतीस हजारांचा दंड ठोठावला आहे,

रविवारी (ता. 3 डिसेबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने सोरेगाव कुमठेरोड वरील उजनी कॅनलच्या उजव्या बाजूस असलेल्या पूनम धाबा (पूर्वीचे नाव मूनलाईट) याठिकाणी छापा टाकला असता होटेल चालक गोविंद नेताजी दळवी हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आला. हॉटेल चालक दळवीसह मद्यपी ग्राहक सैंदप्पा निलप्पा कोंडवान, मोहम्मद इरफान उमरसाब बेन्नूर, शाहरुक रसूल शेख व सरफराज निसार शेख यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 3 बाटल्या, किंगफिशर स्ट्रॉंग बिअरच्या 650 मिलीच्या 2 बाटल्या व प्लास्टीकचे ग्लास असा एकूण एक हजार दोनशे दहा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्याचे दोषारोपपत्र सोमवारी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  नम्रता बिरादार यांच्या न्यायालयात सादर केले असता हॉटेल चालकास 25 हजार रुपये दंड व चारही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड असा एकूण सदोतीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक राहूल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी यांच्या पथकाने पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *