सोलापूर : काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे हौशी व हरहुन्नरी आहेत. हौसेला मोल नाही असे त्यांचे काम आहे. आमदार प्रणिती शिंदे यांची लोकसभा होईपर्यंत विविध उपक्रम ते राबवतील, असे कौतुक माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी येथे बोलताना केले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने युवक काँग्रेसच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जुळे सोलापुरातील भंडारी मैदानावर आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन निम्बर्गीचे युवक नेते सुदर्शन हसापुरे यांच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याहस्ते झाले. यावेळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी महापौर अलका राठोड, गणेश डोंगरे, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, अनुराधा काटकर, भारत जाधव, अनंत म्हेत्रे, राज सलगर, निम्बर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे, काशिनाथ कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुरेश हसापुरे यांनी स्वतः नऊ कार्यक्रम घेतले आहेत. काँग्रेसचे कार्यक्रम राबवायला ते मागेपुढे पाहत नाहीत. हसापुरे सगळ्यांना मदत करतात. खर्च करण्याचे मागेपुढे पाहत नाहीत, काँग्रेसचे ते खजिनदारच आहेत, असा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर बोलताना माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले हसापुरे हे खरोखरच चेतन नरोटे यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचे परमनंट खजिनदारच आहेत, अशा शब्दात कौतुक केले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले, खेळांच्या स्पर्धा राबविण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. खेळामध्ये राजकारण नसते. खरे तर राजकारणामध्येही आता बदल होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.