सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा पाच कोटी 85 लाख 85 हजाराची बेनामी संपत्ती जमा केल्याचा सदर बजार पोलिसात ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी लाचलोचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13 (1)(ई), 13 (2) सहकलम भारतीय दंड संहिता कलम 109 तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 2018 चे कलम 13(1) (ब), 13(2) सहकलम 12 प्रमाणे सदर बजार पोलीस ठाण्यात तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण अनंत लोहार ( वय 50 वर्ष, रा. कोल्हापूर), पत्नी सुजाता किरण लोहार (वय 44), मुलगा निखिल किरण ( वय: 25 , सर्व राहणार प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर 1) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण लोहार यांनी 15 नोव्हेंबर 1993 ते 31 ऑक्टोबर 2022. या कालावधीत स्वतःच्या उत्पन्नापेक्षा 111.93% किमतीची बेनामी संपत्ती जमा केली. लोहार यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी 5 कोटी 85 लाख 85 हजार 623.8/- रू. किमतीची अपसंपदा संपादित केली. पत्नी सुजाता व मुलगा निखिल यांनी लोकसेवक लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास उपाधीक्षक कुंभार करीत आहेत.