राजकुमार सारोळे सोलापूर : कोणाच्या नशिबात कधी, कोणता योग येईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या नशिबातही असा एक वेगळा योग आला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना निवृत्तीनंतर आयएएस पदोन्नती मिळून उद्योग विभागाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून पदावर बसण्याची संधी मिळाली आहे. मुंबईत त्यांनी नुकताच या पदाचा पदभार घेतला असून निवृत्तीनंतर 75 दिवस भारतीय प्रशासक सेवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत वायचळ हे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. दुसऱ्या लाटेच्या वेळी त्यांची बदली झाली. पण बदलीवेळी आयएएस पदोन्नतीत प्रथम क्रमांकाचे नाव असतानाही अनफिट दाखवून प्रकाश वायचळ यांना डावलण्यात आले व जात पडताळणी विभागात नियुक्ती देण्यात आली. सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने राज्यातील २३ अधिकाºयांची आयएएसच्या दर्जावर पदोन्नती केली.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत रिक्त झालेल्या भारतीय प्रशासन सेवा (महाराष्ट्र राज्य संवर्ग) या पदावर या अधिक़ाºयांची पदोन्नतीने निवड केल्याचे भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी जाहीर केले. पण या यादीत नाव न आल्याने वायचळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. पण तोवर गोवर्धन दिकोंडा व रामचद्र उबाळे यांनी माहितीच्या अधिकारात या पदोन्नती कशा झाल्या याची युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे माहिती मागितली.
१४ सप्टेंबर रोजी युपीसीचे सचिव जी. सी. शहा यांनी दिलेल्या माहितीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली होती. महाराष्ट्र शासनाने शिफारस केलेल्या नावांमधून समितीचे अध्यक्ष भारत व्यास यांच्या चार सदस्यीय समितीने ७ आॅगस्ट रोजी बैठक घेऊन पदोन्नतीचे नावे अंतिम केली. या समितीकडे आलेल्या नावांमध्ये पहिले नाव सोलापूर झेडपीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांचे होते. त्यांच्या नावापुढे अनफिट असा शेरा मारून पदोन्नती नाकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध वायचळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होऊन वायचळ यांच्यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाल्यावर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. वायचळ यांना 2020 च्या यादीतील आयएएस ग्राह्य धरण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या केलेल्या सेवेचे परीक्षण करून अहवाल सादर केल्यावर भारतीय प्रशासक सेवेने त्यांना 1994 चे आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नती मान्य केली. केंद्र शासनाच्या कारमिक व प्रशिक्षण विभागाने याबाबत एक ऑक्टोबर रोजी आदेश जारी करून भारतीय प्रशासक सेवेत पुढील आदेश होईपर्यंत परीक्षा दिन म्हणून वाचल्याने नियुक्ती देण्याबाबत महाराष्ट्र शासनाला सुचित केले.
त्यानुसार मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सु. मो. महाडिक यांनी सात डिसेंबर रोजी वायचळ यांना भारतीय प्रशासन सेवेत पुढील आदेश होईपर्यंत उद्योग संचनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्त म्हणून नियुक्ती केली. या पदावर असलेल्या षणमूगराजन एस यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्यामुळे वायचळ यांना आता निवृत्तीनंतरही 75 दिवस भारतीय प्रशासन सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे. याा 55 दिवस कामकाजाचे आहे. आपल्याला न्याय मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘राजकुमार” तुमचे अभिनंदन!
पदभार घेतल्यानंतर वायचळ यांनी ‘सोलापूर समाचार” चे राजकुमार सारोळे यांना प्रथम भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. राजकुमार तुमचे अभिनंदन..! तुमच्या बातमीमुळे मला न्याय मिळाला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेत मोठी ताकद आहे. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्नशील असता. हे तुमच्याच कामाचे कौतुक आहे. तुमची पत्रकारिता अशीच बहरत जावो. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, अशा शब्दात वायचळ यांनी कौतुक केले.