August 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

कुऱ्हाडीने शीर छाटून शेतकऱ्याचा क्रूरपणे खून

सोलापूर :शेतीच्या वादातून भावकीतील चौघांनी एका ६५ वर्षीय वृध्दाची कुऱ्हाडीने गळा चिरून मृताचे शीर घेऊन पलायन केल्याची घटना सोमवारी टेंभुर्णी हद्दीत घडली आहे.

शेवरे शिवारातील कुरणवस्ती येथे शेतीच्या कारणावरुन जाधव परिवारात वाद झाला होता. त्यातूनच ही क्रूरतेची परिसीमा ओलांडणारी घटना घडलीय. ६५ वर्षीय वृद्धाचा भावकीतील चौघा जणांनी कुऱ्हाडीने शिर तोडून धडावेगळे केले, हा थरारक प्रकार सोमवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास घडला. संशयितांनी मृताचं धड घटनास्थळी टाकून शिर घेऊन पलायन केलंय.शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५, रा. कुरणवस्ती, शेवरे) असं मृताचं नांव आहे. शंकर जाधव यांचं  तीन  दिवसांपूर्वी डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, म्हणून ते घरी एकटेच झोपले होते. त्यावेळी भावकीतील चौघांनी मिळून शेतीच्या कारणावरून शंकर जाधव यांच्या घरी जाऊन कुऱ्हाडीने  मानेवर-गळ्यावर वार करून त्यांचं शिर धडावेगळे केले व त्यांचे मुंडके  घेऊन ते पसार झाले. 

शंकर जाधव यांची अमानुष व क्रूर पद्धतीने हत्या झाल्याने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरलं आहे. याबाबत नरहरी नवनाथ बंडलकर (रा.शेवरे) यांनी टेंभुर्णी  पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जोग तपास करीत आहेत.