राजकुमार सारोळे
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी झेडपीच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चक्क पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात घेतली आहे.
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीने इको व्हिलेज ही संकल्पना राबविली आहे. ग्रामस्थांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात या ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी जिल्हा परिषद विविध योजना राबवित असते. या योजनेची फलनिष्पत्ती पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना गावांमध्ये जाणे आवश्यक आहे. हे मर्म ओळखून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अधिकाऱ्यांची समन्वय बैठक मंगळवारी चिंचणी इको व्हिलेजमध्ये घेतली. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सात वाजता संपली. याच दिवशी झेडपीच्या सर्व साधारण सभेचे नियोजन होते. या बैठकीत सर्वसाधारण सभेतील विषयावर निर्णय घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गावामध्ये अशी सर्वसाधारण सभा झाली आहे. यापूर्वी पदाधिकारी असताना असा प्रयोग झाला होता. मावळते अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी ग्रामीण भागामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन केले होते. परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. आता प्रशासकराज असताना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका गावात सर्वसाधारण सभा होणे ही जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिली घटना असल्याचे माजी सदस्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील इशाधीन शेळकंदे, अमोल जाधव व सर्व विभाग प्रमुख, पंचायत समितीच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गावांमध्ये काय काय विकास होत आहे .याची जाणीव अधिकाऱ्यांना होण्यासाठी चिंचणी इको व्हिलेजमध्ये समन्वय बैठक घेतली. जिल्ह्याच्या विकासासाठी एक चांगले वातावरण निर्मितीसाठी माझा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने ही बैठक खूप चांगल्या प्रकारे पार पडली.
-मनीषा आव्हाळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी