
सोलापूर: सीना नदीपात्रात तिर्हे व नंदुर परिसरात रात्री बेसुमार वाळू उपसा सुरू झाला आहे. याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय वाळू उपशाला बंदी असल्यामुळे सीना व भीमा नदीच्या पात्रात वाळू तस्करांचे जाळे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिर्हे व नंदुर येथे दररोज रात्री बेसुमार वाळू उपसा सुरू झाल्याचे दिसून आले आहे. वाळूतस्कर भंगारमध्ये निघालेल्या टेम्पोचा वाळू वाहतुकीसाठी वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. तर तिर्हे येथे चक्क नवीन ट्रॅक्टर व टमटमद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले आहे. ट्रॅक्टरला पत्रा लावून नदीतील वाळू बाहेर काढली जाते. त्यानंतर मजुरामार्फत वाळू टेम्पो व ट्रॅक्टर ट्रॉलीत भरली जाते. विशेष धक्कादायक बाब म्हणजे वाळू भरण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर वाळू तस्कर करीत असल्याचे दिसून आले आहे. या मुलांना धाब्यावर जेवण देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर प्रत्येक खेपेला पन्नास रुपये दिले जातात. तिथून तस्करांचे जाळे सुरू होते. सोलापूर शहराकडे या वाळूची तस्करी होते. शहर परिसरात तस्करीतील आणलेल्या वाळूची विक्री करणारे एजंट सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. ही तस्करी सुरू असताना काही शासकीय कर्मचारीही तेथे भेट देऊन आपला डाव साधत असल्याचे दिसून आले आहे. महसूल प्रशासनाने शासकीय दराने वाळू विक्रीचे टेंडर काढले आहे पण अद्याप सोलापूर परिसरात कोठेच असे वाळू विक्रीचे डेपो सुरू झालेले नाहीत त्यामुळे वाळू तस्करांचे फावले असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाच्या गौण खनिज विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कुमाराशीर्वाद यांनी वाळू तस्करांविरुद्ध मोहीम उघडण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे. सांगलीच्या पालकमंत्र्यांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहिम उघडण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्याप्रमाणेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनची बैठक होत आहे. या बैठकीत या विषयावर लक्षवेधी होण्याची शक्यता आहे.