अरे हे काय? ‘काजळी”ने वाढवली पुन्हा ‘काळजी”
सोलापूरच्या गंभीर समस्येकडे प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष

- सोलापूर : राज्यात कोरोनाची चिंता वाढत असतानाच सोलापूरकरांना मात्र पुन्हा त्या जुन्या समस्येनेच ग्रासले आहे. सोलापुरात काजळीचे प्रमाण पुन्हा वाढल्याने लोकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
सोलापुरातील होटगीरोड, जुळे सोलापूर, विजापूर रोड परिसरात काजळीचे प्रमाण वाढले आहे. रात्री घरावर, अंगण, रस्त्यावर काजळी पसरत चालली आहे. इतकेच काय घरासमोर लावलेली वाहने, वाळू घातलेले कपडे काजळीने घाण होत चालली आहेत. दररोज पसरणाऱ्या काजळीचे प्रमाण इतके वाढले आहे की घराचे छत काळे पडत चालले आहे. हवेत पसरलेली काजळी नाकात तोंडात तर डोळ्यात जात असल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात काजळी गेल्याने धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
देशभरात हवेचे प्रदूषण वाढलेले असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे परिसरात सकाळी फेरफटका मारून प्रदूषण कमी करण्यावर भर दिला आहे. मात्र सोलापुरात हवेत पसरणाऱ्या काजळी व धुळीच्या समस्याकडे कोणाचेच लक्ष नाही. सोलापुरात दरवर्षी काजळीचा प्रश्न निर्माण होतो. पण ही काजळी कोणत्या कारखान्यातून येत आहे याचा प्रदूषण मंडळ शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषण मंडळाचा हा दावा हास्यास्पद असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तातडीने काजळीचा बंदोबस्त न केल्यास प्रदूषण मंडळावर मोर्चा नेण्याचा इशारा जुळे सोलापुरातील नागरिकांनी दिला आहे.