सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून तयार आहेत पण त्यामध्ये यंत्रणाच नाही अशी तक्रार आमदार व सदस्यांनी केल्यावर माजी आरोग्य मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्यात आरोग्याची बोंबाबोंब आहे तर डीएचओनाच बदला अशी मागणी केली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य व प्राथमिक शिक्षण विभाग आमदारांच्या रडारवर राहिला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून तयार ठेवले आहेत पण त्याचे उद्घाटनच केले नाही अशा तक्रारी आमदारांनी केल्या. आमदार राम सातपुते त्यांनी माळशिरस तालुक्यातील एक कोटी खर्चून बांधलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारती डॉक्टर व कर्मचाऱ्याअभावी ओस पडल्याचे निदर्शनाला आणले. आमदार समाधान आवताडे यांनी मरवडे येथील एकच आरोग्य केंद्र चांगले चालते व इतर केंद्रात काहीच गर्दी नसल्याचे निदर्शनाला आणले. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती उद्घाटनाअभावी पडून असल्याचे सांगितले. आमदार सुभाष देशमुख यांनीही आपल्या मतदारसंघात ही स्थिती असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी कर्मचारी भरती नसल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले. खासदार पवनराजे निंबाळकर यांनी कर्मचारी मंजूर नसताना इमारती कशा बांधल्या असा सवाल उपस्थित केला त्यावर डॉ. नवले यांनी इमारती बांधकाम नंतर कर्मचाऱ्यांची पदे मंजुरीसाठी पाठवले जातात पदभरती शासनाकडून शासनाकडून होते अशा अडचणीचा पाढा वाचला. त्यावर आमदार व सदस्य संतापले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्यातील आरोग्याची बोंबाबोंब आहे. डीएचयोना नीट उत्तर देता येत नसेल तर त्यांची बदली करा अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आठ दिवसाची मुदत देत प्राथमिक आरोग्य केंद्राचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर आमदार सातपुते यांनी मागील बैठकीत प्राथमिक शिक्षकांची कमतरता असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर प्राथमिक शिक्षण विभागाने काय केले याचे उत्तर द्यावे असा मुद्दा उपस्थित केला.