सोलापूर : जिल्ह्यातील शेतकरी व दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेने कृषी व समाजकल्याण योजनांची शुक्रवारी लॉटरी जाहीर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी विभागाची अवजारे वाटपाची लॉटरी काढण्यात आली. झेडपीवर प्रशासकराज असल्याने अवजारे वाटपाचा लाभ पारदर्शकपणे होण्यासाठी दुसऱ्यांदा लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. यावेळेस कृषी अवजारासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सुलभतेने अर्ज करण्यासाठी पहिल्यांदाच बारकोड पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे कृषी अवजार वाटप योजनेला यावेळेस जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. शाळकरी मुलांच्याहस्ते अवजार वाटपाच्या लॉटरीला सुरुवात करण्यात आली. पहिल्यांदा सांगोला तालुक्यातून थ्री पिस्टनची लॉटरी काढण्यात आली. यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची सीईओ मनीषा आव्हाळे यांनी स्वतः खात्री केली. लॉटरीची प्रक्रिया कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे, दक्षिणचे गटशिक्षण गटविकास अधिकारी वाघ, प्रशासन अधिकारी लिंगराज यांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे. लॉटरी निवड झालेल्या लाभार्थ्यांची नावे सोमवारी पंचायत समितीत उपलब्ध करण्यात येणार आहेत.
यानंतर समाजकल्याण विभागाच्या योजनांची दिव्यांग विद्यार्थ्यांच्याहस्ते लॉटरी काढण्यात आली. यावेळी सीईओ आव्हाळे यांनी आलेल्या अर्जाची यादी तपासून पाहिली. समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय लॉटरी पद्धत सुरू आहे. प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी दोन्ही विभागाचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आहे.

More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी