सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत सोलापूर जिल्हा आरोग्याच्याबाबतीत तोंडघशी पडले आहेत. तत्कालीन डीएचओ जाधव यांच्यावर त्यांनी किरकोळ कारणावरून कारवाई केली मग आत्ताचे डीएचओ डॉ. संतोष नवले यांचे काय करणार ? असा आता सवाल उपस्थित होत आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात गुरुवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्ह्याच्या आरोग्यावरून सर्व आमदार व नियोजन समितीचे सदस्य आक्रमक असल्याचे दिसून आले. माजी आरोग्यमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख यांनी तर चक्क डीएचओ डॉ. संतोष नवले यांना बदला अशी मागणी केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यात आरोग्याची ही दुरावस्था दिसून येत आहे. गतवर्षी हिवाळी अधिवेशनात आमदार रणजीतसह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या बांधकाम प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला संबंधित विभागाने उत्तर दिल्यानंतर ते समाधानी झाले होते. असे असतानाही याच प्रश्नावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अधिवेशनात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना निलंबित करण्याची घोषणा केली होती. अधिवेशनातील घोषणेनुसार डॉ. जाधव यांना 31 डिसेंबर 2022 रोजी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईबाबत वेगवेगळ्या चर्चा घडल्या होत्या. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सलाईनवर आल्याच्या तक्रारी वाढल्यावर त्यांनी डॉ. नवले यांची नियुक्ती केली. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागात मोठ्या सुधारणा होणे अपेक्षित होत्या. पण जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सर्वच आमदारांनी आरोग्य केंद्राच्या तयार इमारती धुळखात पडल्याबाबत तक्रारी केल्या. आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी शासनाने कर्मचारी उपलब्ध केले नसल्याचे सभागृहाला निवेदन केले. यावर कोणत्याच आमदारांचे समाधान झालेले नाही. माळशिरस तालुक्यातील एका आरोग्य केंद्राचा प्रस्ताव गेला नाही म्हणून तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित व्हावे लागले तर आता कित्येक नव्या इमारतीत आरोग्य केंद्राचा कारभार सुरू नसल्यामुळे ही जबाबदारी कोणाची ? असा सवाल उपस्थित होत आहे. माजी आरोग्यमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख यांनीच याबाबत संताप व्यक्त केल्यावर जिल्हा आरोग्य विभागाची यंत्रणा किती तकलादू आहे, हे आता समोर आले आहे. कोरोना पुन्हा एकदा वेशीवर असताना आरोग्य विभागाची यंत्रणा कोलमडल्याबद्दल चिंतेचा विषय झाला आहे. जिल्ह्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार नाही पडलेल्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलनही केले आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री सावंत आता या गंभीर विषयाबाबत कोणती भूमिका घेतात याकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे.