सोलापूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाचे इंट्री झाली आहे सोलापूर व मोहोळ तालुक्याच्या काही भागात पाऊस पडल्याचे वृत्त असून शेतात उभ्या असलेल्या ज्वारीच्या पिकाला मोठा धोका होणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
वेळा अमावश्या तोंडावर आहे. शिवारात डोलणारे ज्वारीचे पीक पाहून शेतकरी वर्ग आनंदात आहे. यंदा पावसाळ्यात पाऊस कमीच झाला पण अवेळी आलेल्या पावसाने ज्वारीच्या पिकाला फायदा झाला. ज्वारीचे पीक आता जोमात आहे. बऱ्याच ठिकाणी ज्वारीची कणसे निसवली असून हुरडा सुरू झाला आहे. अशात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दोन दिवसापूर्वीच पावसाबाबत अंदाज व्यक्त केला होता. 8 जानेवारी पासून ढगाळी हवामान निर्माण होईल व बाजूच्या जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या इशाराप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून ढग भरून आले आहेत. मंगळवारी पहाटे सोलापूर शहर परिसर व मोहोळ तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. या अवकाळी पावसाने ज्वारीच्या पिकाला मोठा फटका बसणार आहे. ज्वारी काळी पडण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पण ज्यांनी उशिरा पेरणी केली आहे अशा पिकांना व गव्हाला या पावसाचा फायदा होऊ शकतो असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. एकीकडे चिंता तर दुसरीकडे आनंद अशी स्थिती झाली आहे. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच अध्यादेश जारी करत अवकाळी, गारपीटने नुकसान होणाऱ्या भरपाईत मोठी वाढ केली आहे.