सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे दीर्घ रजेनंतर पुन्हा कामावर हजर होण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
टप्पा अनुदानावर आलेल्या माध्यमिक शाळांची अनेक प्रकरणे रखडलेली असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी प्रकृतीचे कारण सांगत ऑक्टोबरमध्ये दीर्घ रजा मागितली होती. पण सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पहिल्यांदा रजेला नकार दिल्यावर ते कामावर हजर झाले पण त्यांनी रजिस्टर गहाळ प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले. त्यांना टप्पा अनुदानाची प्रकरणे निकालात काढण्याबाबत सूचना केल्यावर पुन्हा कामावर हजर होऊन रजिस्टर गहाळपकरणी पोलीसात तक्रार दिली. पण त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले. टप्पा अनुदानाच्या अनेक फाईली रखडल्याबाबत वारंवार उपसंचालकांकडून पत्रे येऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. फडके रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे. अंधारे यांनी आता चांगल्या पद्धतीने काम सुरू केले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील बरीच कामे आता हळूहळू मार्गी लागत आहेत. थोड्याच दिवसात परिस्थितीत आणखी सुधारणा होईल. पण फडके यांनी कामाच्या वेळी रजा काढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. वारंवार सांगूनही त्यांनी या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सीईओ आव्हाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
तीन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने आता कामावर हजर राहण्याची फडके यांनी तयारी दर्शवली असल्याचे सांगण्यात आले. पण कामावर हजर होताना त्यांना आता वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. पूर्णवेळ शिक्षणाधिकारी हजर झाल्याने टप्पा अनुदानातील शालार्थ आयडीची प्रकरणे व इतर अनेक कामे लवकर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे फडके गुरुजी कामावर हजर राहल्याने माध्यमिक शिक्षण विभागाच्या शाळांचे कामकाज सुरळीत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.