सोलापूर: प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाल न्याय मिळवून द्यावा, डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडियाप्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर  येथील श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मिडिया संपाद,  पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार हजार डिजिटल मिडिया क्षेत्रातील संपादक, पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

या अधिवेशनासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी अधिवेशनाचे उदघाटन उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक तेजस राऊत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील,उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के,कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर,जिल्हा सचिव धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक मुलाखत प्रसिद्ध अभिनेते निर्माता दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी घेतली. अजित पवार यांनी मुलाखतीत रोखठोक भूमिका स्पष्ट करीत महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते महायुतीच्या पाठिंबापर्यंतच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडियाप्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियातील  योगदानाबद्दल राजा माने यांचे कौतुक केले. आयुष्यात आलेल्या संकटांना संधी मानून आपल्याबरोबरच ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार बांधवाला न्याय देण्यासाठी संघटना निर्माण केली.राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे काम कौतुकास्पद असून डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवाची एक सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून निर्मिती करावी यामध्ये आम्हाला सहभागी करून ट्रस्ट विश्वस्त यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू यामध्ये पत्रकार कुटुंब कल्याण,आरोग्य, शिक्षण यात  पत्रकारांसाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  खासदार धनंजय महाडिक यांनी डिजिटल मीडिया पत्रकार संघटना देशातील एकमेव डिजिटल संघटना असून याचे राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतभर विस्तार करावा अशी सूचना केली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वर्षा लांजेवार (चंद्रपूर), प्रा.शिवराज मोटेगावकर (लातूर), तुकाराम कुंदकुरे (छत्रपती संभाजीनगर), विकास थोरात (सातारा), विद्या पोळ (कोल्हापूर), डॉ. प्रिया शिंदे व डॉ.अरुणा बर्गे (सातारा), निखिल वाघ (पुणे), भारती चव्हाण (सांगली), प्रवीण माळी (सांगली), शशिकांत धोत्रे (सोलापूर),डॉ. राहुल कदम (पुणे), प्रकाश अवताडे (सांगली), नलिनी गायकवाड (पुणे )यांना सन्मानित करण्यात आले,  डिजिटलस्टार गौरव पुरस्कार कृष्णराज महाडिक (कोल्हापूर), संजय कांबळे (पुणे) व नागनाथ सुतार (पंढरपूर) यांना देण्यात आला.

परिसंवादात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यम या विषयावर छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे, सायबरचे डॉ. राजेंद्र पारिजात, डिजिटल एडिटर मोहसीन मुल्ला, डॉ.रवींद्र चिंचोलकर, नंदकुमार सुतार यांनी मार्गदर्शन केले. राज्य संघटक प्रमोद तोडकर यांनी  ११ ठराव मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *