सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्रावर प्रतिनियुक्तीवर असलेल्या आरोग्य सहाय्यक बाबा काळजे यांने भलताच कांड केल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या कलावती चव्हाण यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून डॉ. नवले यांनी आरोग्य सहाय्यक काळजे याची चौकशी लावली आहे. आरोग्य सहाय्यक काळजी हे प्रतिनियुक्तीवर आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत. या ठिकाणी काम करताना त्यांनी आरोग्य सेविकांना अपरात्री व्हाट्सअपवर मेसेज केले. आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यास चौकशी लावण्याची धमकी दिली. वारंवार त्याच त्याच आरोग्य सेविकांना प्रशिक्षणासाठी बोलावल्याची गंभीर तक्रार आहे.
अजून प्रतिनियुक्ती कशी?
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी हजर होण्याचे आदेश दिले आहेत . याबाबत प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी घेण्यात आली होती. त्यात काळजे यांचे नाव आत्तापर्यंत आले नव्हते. पण आत्ता गंभीर तक्रार आल्यानंतर ते प्रतिनियुक्तीवर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मग काळजे यांना पाठीशी घालतय कोण? असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे.