सोलापूर : दुधाचे भाव ढासळल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले आहे. जिल्हा परिषदेमार्फत हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात शहराकडे रोजगारासाठी गेलेल्या तरुणांचा रोजगार गेला. त्यामुळे असे तरुण शेतावर परतले आहेत. या तरुणांनी आपल्या जीवनासाठी भावी मार्ग शोधला आहे. अनेक तरुण शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढले आहे. साहजिकच यामुळे बाजारात दुधाचे भाव ढासळल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आंदोलने होऊ लागल्याने महाराष्ट्र सरकारने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी याबाबत नुकतेच पशुसंवर्धन विभागाची बैठक घेऊन नियोजन केले आहे. पशुसंवर्धन विभागाकडे सर्वेक्षणात आलेल्या गायींची संख्या नोंद आहे. अशा गाईंना यापूर्वीच टॅग देण्यात आला आहे. तरीही नव्याने अनेक जण या व्यवसायात येत आहेत. मग या शेतकऱ्यांना अनुदान कसे देणार? असा प्रश्न उभा राहतो.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे म्हणाले की शासकीय, सहकारी, खाजगी दूध संकलन संस्थाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी दूध संस्थांकडे दूध घालणे बंधनकारक आहे. शहराभोवती असलेले बरेच शेतकरी गवळी किंवा थेट वरव्याने दूध घालतात. अशा शेतकऱ्यांना मात्र हे अनुदान मिळणे अवघड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या दूध संस्था ऑनलाईन पद्धतीने दुधाचे संकलन करून बँकेच्या खात्यावर पेमेंट जमा करतात अशा संस्थांकडे दूध घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाचे हे अनुदान मिळवण्यासाठी आता जवळच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडे याची नोंद करून दूध संस्थांकडे दररोजचे दूध जमा करणे गरजेचे होणार आहे. यापूर्वी अशा संस्थांमध्ये दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र लवकरच अनुदान मिळणार आहे.