सोलापूर : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ वर्षांवरील एकूण ७ लाख महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, कंदलगावचे सरपंच शारदा कडते, उपसरपंच चाँद बादशाह सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, डॉ.फहिम गोलेवाले , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतीशील ए. आय. तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणे,सोनोग्राफी व मॅमोग्राफ उपकरणे पुरवणे, जनजागृती करणे, उपचाराकरीता पाठपुरावा करणे, तज्ञांचा सल्ला घेणे,उपचारास जिल्हा परिषद निधी मधून २० हजार पर्यंत सहाय्य करणे या गोष्टींचा समावेश आहे.
मिशन प्रोजेक्ट निदान
महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढत आहे त्यामुळे याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. महिलांनीही या आजाराविषयी न घाबरता पुढे येऊन तपासणी करून घ्यावी आणि या तपासणीसाठी पुरुषांनीही आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे.या मोहिमेला प्रोजेक्ट निदान हे नाव देण्यात आले आहे. कारण कर्करोग सारख्या आजारात लवकर निदान हाच सर्वात मोठा उपचार असतो म्हणूनच यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी यावेळी दिली.
आजच्या स्तन कर्करोग तपासणीच्या मोहिमेसाठी उपस्थित 42 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली सदर मोहीम मध्ये निदान व उपचार जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रात मधील सोलापूर जिल्हा हा पहिला उपक्रम राबवण्यात येत आहे .स्तनाच्या कर्करोग आढळण्याचे प्रमाण 14% असून सदरचे प्रमाण तंबाखू जन्य पदार्थामुळे होणाऱ्या मुखाच्या कर्करोगापेक्षा (10%) अधिक आहे. स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यूचा दर 11.1% असून सोलापूर जिल्ह्यातील 26 पैकी 1 महिलेला कर्करोग होण्याची शक्यता असून 30 वर्षावरील महिलांची तपासणी करून प्रथम टप्प्यात निदान आणि उपचार मिळाले तर मृत्यू जोखिम कमी होऊ शकते.
त्यामुळे सदर ‘project निदान हे महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे आव्हाळे यांनी सांगितले.
अशी आहे स्थिती…
दक्षिण सोलापूर हा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने येथील आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेने लक्ष घालून शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दक्षिण सोलापूर तालुक्याचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशिल रहावे अशी अपेक्षा आ.सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित तज्ञांनी कर्करोगाविषयी मार्गदर्शन केले.