बापरे..! गुटक्याचा तोबरा भरणाऱ्या झेडपीच्या कर्मचाऱ्यास 5 हजाराचा दंड
सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या ॲक्शनमुळे कर्मचाऱ्यांना बसली धास्ती

सोलापूर : कार्यालयात ड्युटीवर असताना तोंडात गुटक्याचा तोबरा भरणाऱ्या कर्मचाऱ्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पाच हजाराचा दंड करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.
महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रम सायंकाळी झाल्याने सन्मान झाल्यावर महिला कर्मचारी घाईघाईने बाहेर पडत होत्या. त्यावेळी आव्हाळे यांनी त्यांना थांबवले. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे म्हणून इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी विश्वासाने संवाद साधला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या अडचणी सांगितल्या. त्यानंतर सीईओ आव्हाळे यांनी अचानकपणे दुपारी बांधकाम कार्यालयाला भेट दिली. कार्यालयातील स्वच्छता व कर्मचारी कसे बसतात याची पाहणी केली. यावेळी एका कर्मचाऱ्यांच्या तोंडात गुटक्याचा तोबरा दिसला. त्यांनी तात्काळ त्या कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केली. कार्यालयीन कामकाजावेळेस अस्वच्छता करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्या कर्मचाऱ्यास पाच हजाराचा दंड करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर कार्यालयात असलेल्या पाण्याच्या बाटल्यांचीही त्यांनी तपासणी केली. कार्यालयात महिला सहकारी असतात, स्वच्छता राखा, जेवणाच्यावेळी घाणीचे प्रदर्शन होईल असे कोणतेही कृत्य करू नका अशी ताकीद त्यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या या पावित्र्यानंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. आव्हाळे यांनी पदभार घेतल्यापासून जिल्हा परिषद परिसर व कार्यालयातील स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष दिले आहे. दररोज सफाई कर्मचाऱ्यांकडून परिसराची साफसफाई केली जाते. त्यामुळे कार्यालयीन परिसरात पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर जरब बसली पाहिजे अशी ॲक्शन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. कार्यालयीन परिसरात सीसी कॅमेराची नजर आहे. यावरून प्रशासन कर्मचाऱ्यांबरोबर कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही दंड करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.